कणकवली दि.१२ जानेवारी(भगवान लोके)
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणपत विठोबा वळंजू उर्फ बाळा वळंजू तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर रजनीकांत कुशे उर्फ गणेश कुशे यांची निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने यांची बिनविरोध निवड झाली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे मावळते अध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीप पारकर यांनी अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी संस्थेच्या फोंडाघाट येथील प्रधान कार्यालयात पार पडले. अध्यासी अधिकारी सौ. यु. यु. यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदासाठी गणपत वळंजू तर उपाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर कुशे यांचे प्रत्येकी एक अर्ज असल्याने यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहिर केले.
नवनिर्वाचित संचालक दिलीप राजाराम पारकर, सुनील दिगंबर कोरगावकर, गणपत शंकर पारकर, संजय धाकू पेडणेकर, सुनील शशिकांत डुबळे, समीर प्रमोद वंजारी, उमेश सहदेव वाळके, सौ. अनिता अनिल रेवडेकर, सौ. रश्मी राजेंद्र माणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अध्यासी अधिकारी सौ. यु.यु. यादव व एस.एम. मयेकर यांचे स्वागत संचालक दिलीप पारकर व सुनील डुबळे यांनी केले. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना भावी वाटचालीसाठी संचालक मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पद गेली सात वर्ष भूषविताना सर्व संचालक व कर्मचारी यांचे बहूमोल सहकार्य लाभले. संस्था आज भक्कम स्थितीत आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच संस्थेची आर्थिक उलाढाल 600 कोटींवर पोहोचली आहे. आपणही नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना असेच सहकार्य करूया व संस्था प्रगतीपथावर नेत अधिक भक्कम करूया असे आवाहन मावळते अध्यक्ष दिलीप पारकर यांनी केले.
संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना नूतन अध्यक्ष गणपत वळंजू यांनी संस्थेच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया असे सांगतानाच सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा केली. त्याचबरोबरच संस्थेचे आजी, माजी संचालक, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानताना आपल्यावर दिलेली जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडत सर्वांचा विश्वास सार्थ ठरविणार असे सांगितले. आभार संचालक उमेश वाळके यांनी मानले. निवडणूक अधिकारी सौ. यु.यु. यादव व एस.एम. मयेकर यांनी काम पाहिले.