छ. शिवरायांचा इतिहास जगायचा असतो – अभिनेते अजय तपकिरे

सावंतवाडी,दि.१८ फेब्रुवारी

शिवजयंती कशी साजरी करावी, त्याच्या मागचा उद्देश काय, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवजयंती डोक्यावर घेऊन साजरी करायची नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात ठेवून शिवजयंती साजरी करा. शिवरायांचा इतिहास नुसता पाहायचा नसतो तर तो जगायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराज वाचायला हवेत असे उद्गार बहिर्जी नाईक फेम अभिनेते अजय तापकिरे यांनी सावंतवाडी येथे काढले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आजपासून अर्चना फाउंडेशनच्या वतीने सौ. अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रे व शिवरायांच्या प्रतिमांचे तीन दिवसीय प्रदर्शन व शिबिर आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेतील बहिर्जी नाईक यांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते अजय तापकिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तपकीरे बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सौ. अर्चना घारे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जेष्ठ नेते विकास सावंत,जिल्हा बँके संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ॲड. संदीप निंबाळकर, राजू कामत, काका मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते नंदकुमार पाटील, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, रेवती राणे, अँड नकुल पार्सेकर,सागर नाणोसकर , संदीप घारे व्यासपीठावर उपस्थित होते.
हजारो तरवालीचे युद्ध एका वाघनखाने जिंकता येत. मात्र त्याला अफाट बुद्धिमत्ता लागते हे शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून सिद्ध केले. शिवाजी महाराजांकडे आत्मविश्वास होता. मॅरेथॉनच्या पठारावरील विजयाची बातमी देण्यासाठी ग्रीक सैनिक ४२ कि. मीटर अंतर धावला आणि त्याने आपल्या राजाला आनंदाची बातमी देऊन आपले प्राण सोडले. तेव्हापासून सुरू झालेल्या मॅरेथॉनचे उदात्तीकरण केले जाते. मात्र शिवाजी महाराज व त्यांचे मावळे अमावास्येच्या रात्री पावसामध्ये शत्रू पाठीवर घेऊन पन्हाळा गडापासून विशालगडा पर्यंत न थांबता ५२ किलोमीटर धावले, हा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे, हे आपले दुर्भाग्य आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीसमोर आला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाने महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, हीच खरी शिवजयंती असे मत तपकीरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सौ. अर्चना घारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज वाचायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन तुम्ही वाटचाल केली तर कुठेच अडथळा निर्माण होणार नाही. या भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज ३५०-४०० वर्ष पुर्वी शस्त्र घेऊन लढले ती शस्त्रे आजच्या पिढीने अभ्यासायला हवीत.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. नकुल पार्सेकर, नंदकुमार पाटील, बबन साळगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिवप्रेमी व किल्ले गड संरक्षक सागर नाणोसकर, प्रभाकर परब,डॉ.सजीव लिंगावत, संदेश गोसावी, डॉ. कमलेश चव्हाण, अभिनेते नंदकुमार पाटील यांचा सत्कार अभिनेते अजय तापकिरे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक सौ अर्चना घारे यांनी तर सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारे शस्त्र प्रदर्शन शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला सुरू झाले असून तीन दिवस ते सुरू राहणार आहे असे सौ अर्चना घारे यांनी सांगितले.