कणकवली बसस्थानक आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे

कणकवली ते ओरोस सिंधुदूर्गनगरी नियमित बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी

ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने आग्रही मागणी

तळेरे,दि.१८ फेब्रुवारी

कणकवली बसस्थानक आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. त्याचबरोबर कणकवली ते ओरोस सिंधुदूर्गनगरी अशी नियमितपणे सुरू असलेली सकाळी जाणारी आणि संध्याकाळी येणारी बस फेरी बंद करण्यात आली असून ती पूर्ववत सुरू करण्यात यावी तसेच अन्य मागण्यां संदर्भात एसटीचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांना ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन या प्रश्नी लक्ष वेधण्यात आले.

कणकवली बसस्थानक हे जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानक समजले जाते. प्रवाशांची व शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात सतत वर्दळ सुरू असते. परंतु बसस्थानक परिसरातील रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले असून धुरळ्याचे साम्राज्य वाढल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना धुरळ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना होणारा त्रास वेळीच थांबविण्यासाठी पाण्याचा वापर करून सतत उसळणाऱ्या धुरळ्याचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याचबरोबर संपूर्ण रस्ता डांबरी करण्यात यावा अशी आग्रही मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून सकाळी विविध खात्यात कामावरती जाणाऱ्या सरकारी कर्मचारी वर्गासाठी प्रत्येक तालुक्यातून थेट मुख्यालयापर्यत एसटी बस सेवा सुरू करण्यात आलेली होती. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली व कणकवली बसस्थानकातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी तसेच सायंकाळी ६ वाजता परत येणारी एसटी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने सरकारी कर्मचारी वर्गाची तसेच सरकारी कामानिमित्त जाणाऱ्या नागरीकांची बरीच गैरसोय होत आहे. तरी सदरची बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांना देण्यात आले. त्याचबरोबर या प्रश्नांबाबतची विचारणा करुन चर्चा करण्यात आली. तसेच याबाबतची प्रत आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व व्यवस्थापकीय संचालक- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना देण्यात आली आहे.
विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी कणकवली, तळेरे आणि सिंधुदुर्गनगरी या तिन्ही बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळास दिली.
यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफभाई पिरखान, तालुका अध्यक्षा सौ.संजना सदडेकर, श्री. तळवडेकर उपस्थित होते.