देवगड,दि.१८ फेब्रुवारी
जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत ऋषी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज रविवारी मध्यरात्री २.३५ वा. त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते. श्री. विद्यासागर महाराज यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जैन बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री २.३० वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले. आचार्य शेवटच्या श्वासापर्यंत शुद्धीत राहिले आणि त्यांनी मंत्रोच्चार करत आपला प्राण सोडला.
विद्यासागर महाराज यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांनाही आदरांजली वाहिली.
आचार्यजींचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ रोजी कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील सदलगा गावात झाला. त्यांनी ३० जून १९६८ रोजी राजस्थानमधील अजमेर शहरात त्यांचे गुरु आचार्यश्री ज्ञानसागर जी महाराज यांच्याकडून मुनिदीक्षा घेतली. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून आचार्यश्री ज्ञानसागरजी महाराजांनी त्यांच्यावर आचार्यपदाची जबाबदारी सोपवली होती. आचार्यश्री १९७५ च्या सुमारास बुंदेलखंडमध्ये आले. बुंदेलखंडच्या जैन समाजाच्या भक्ती आणि समर्पणाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपला बहुतेक वेळ बुंदेलखंडमध्ये घालवला. आचार्यश्रींनी सुमारे ३५० दीक्षा दिल्या आहेत. त्यांचे शिष्य जैन धर्माचा प्रसार करण्यासाठी देशभर फिरत आहेत.