फुल विक्रेत्या महिलांना आम. वैभव नाईक यांनी स्व:खर्चातून दिले स्टॉल

0

मालवण,दि.१२ जानेवारी

मालवण शहरातील मेढा येथील जय गणेश मंदिरासमोर फुल व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्या महिलांना माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व बंड्या सरमळकर यांच्या पुढाकारातून आम. वैभव नाईक यांनी स्व: खर्चातून चार स्टॉल उपलब्ध करून दिले. या स्टॉलचे लोकार्पण आम. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टॉलच्या सोयीबद्दल महिलांनी आम. वैभव नाईक यांचे आभार मानले.

मेढा येथील जय गणेश मंदिर समोर फुले व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या महिला गेली १५ वर्षे रस्त्याच्या कडेला टेबल लावून उन्हाचा त्रास सहन करत आपला व्यवसाय करत आहेत. उन्हामुळे त्यांच्या फुलांचेही नुकसान होत असे. त्यामुळे याठिकाणी स्टॉल उपलब्ध झाल्यास व्यवसाय करणे सुकर होईल अशी मागणी या महिलांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते बंड्या सरमळकर यांच्याकडे केली होती. जावकर व सरमळकर याबाबत आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले असता आम. नाईक यांनी महिलांना स्टॉल देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आम. नाईक यांच्या स्व:खर्चातून उपलब्ध झालेले पत्र्याचे चार स्टॉल पूजा साहित्य विक्रेत्या नीलम भाबल, साधना भाबल, सुषमा केळूसकर, इरमीन फर्नांडिस या महिलांना देण्यात आले. या स्टॉलचे लोकार्पण आम. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महेश जावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, बंड्या सरमळकर, मंदार केणी, सन्मेष परब, नरेश हुले, सेजल परब, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, सुरवी लोणे, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर, मनोज मोंडकर आदी व इतर उपस्थित होते.