राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त प्रवासी संघ कार्यक्रम
कणकवली दि .१९ फेब्रुवारी(भगवान लोके)
अपघात टाळणे नक्कीच आपल्या हातात आहे. त्यासाठी सीटबेल्ट, हॅल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. तर अपघात घडल्यानंतर जखमींना अवश्य मदत करा. कारण, अशी मदत केली तरी आपल्याला संबंधित कोणतीही शासकीय यंत्रणा त्रास देऊ शकत नाही, असे न्यायालयाचे आदेश आहेत. काटेकोरपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन वाहन चालविताना करा, असे मार्गदर्शन मोटार वाहन निरीक्षक मनोज लोनारी यांनी केले.
कणकवली तालुका प्रवासी संघाच्यावतीने येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात
राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोनारी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक प्रितम पोवार, पद्मश्री परशुराम गांगावणे, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर आदी उपस्थित होते. लोनारी म्हणाले, तुलना केली तर दिवसाची वाहतूक ७० टक्के व रात्रीची
वाहतूक ३० असते तरीही रात्रीचे अपघात जवळपास ७० टक्के घडतात. कारण, समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईट्स डोळ्यांवर पडतात. त्यातच हल्ली हॅलोजन लाईट्स वापरून समोरच्याला त्रास देण्याचेही प्रकार होतात. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. रात्री झोपेचाही अंमल असतो. विशेषतः पहाटे ३ ते सकाळी ६ ही गाढ झोपेची वेळ असते. परिणामीही अपघात घडतात.
खासगी वाहन चालविताना चारचाकी चालकाने सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे. सिटबेल्ट नसेल तर अपघातात क्षणभरात डोके समोरील डॅशबोर्डवर आपटते व तेवढ्या वेळेमध्ये एअरबॅग्जही ओपन होत नाही. तसेच दुचाकीस्वाराने नेहमी हॅल्मेटचा वापर करावा, कारण, दरडावर आदळलेल्या टरबूजाची होते तशीच स्थितीत सिमेंटच्या रस्त्यावर आदळलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्याची होते. हॅल्मेटमुळे अन्य वाहनांचे आवाज ऐकू येत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. पण, चांगल्या दर्जाच्या हॅल्मेटमध्ये भोवतालच्या वाहनांचे अगदी ‘मायक्रो साऊंड ही ऐकायला येत असतात, अशी रचना केलेली असते.
संबंध रस्ताभर आपल्याला वेगवेगळी चिन्हे दिसत असतात. प्रत्येक चिन्ह आपत्त्याला काही ना काही माहिती देत असते. मात्र, रस्त्यांच्या कडेला दिसणाऱ्या स्पिडब्रेकर, शाळा, वळण या सगळ्या बोर्ड, चिन्हांकडे आपण दुर्लक्ष करतो.
अजयकुमार सर्वगोड म्हणाले, तालुका प्रवासी संघाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजासाठी झटणारी ही मंडळी आहेत. या देशाचे दरडोई उत्पन्न वाढायला हवे, त्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारी उचलायला हवी. दीक्षांत देशपांडे म्हणाले, आज या कार्यक्रमामध्ये मोटार वाहन निरीक्षक यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्वाचे आहे. विनायक जोशी म्हणाले, अपघातांचे प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. मात्र, सर्वांनीच काळजी घेतली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. परशुराम गंगावणे यांनीही अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पद्मश्री परशुराम गांगावणे, पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण, साहित्यिका तथा शिक्षिका सरीता पवार, सामाजिक कार्यकर्ते राजस रेगे, पोलिस कर्मचारी राजाराम पाटील, रिक्षाचालक महेंद्र उर्फ राजू चिंदरकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, एसटी चालक संदीप शिरोडकर, स्वच्छताविषयक कामगिरी करणारे किशोर तांबे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष रवी परब, तालुका पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, भालचंद्र मराठे, संजय मालंडकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सुगंधा देवरुखकर, सुभाष राणे, प्रवासी संघाचे सचिव विलास चव्हाण, रमेश जोगळे आदी उपस्थित होते. श्रद्धा कदम, आयेशा सय्यद, पूजा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.