मालवणी बोलीभाषेत उत्तम साहित्य निर्माण व्हावं आजगाव साहित्य कट्ट्यावरील वक्त्यांचा सूर

सावंतवाडी दि.१९ फेब्रुवारी 
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा चाळीसावा मासिक कार्यक्रम नुकताच आजगाव मराठी शाळेत पार पडला. ‘मालवणी बोली भाषे’साठी वाहिलेल्या या कार्यक्रमात सर्व साहित्यप्रेमींनी आस्थेने आपली मते मांडली. सर्व प्रथम कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कट्ट्याचा व कार्यक्रमाचा विषय स्पष्ट केला आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.
प्रथम सोमा गावडे यांनी मालवणी बोलीचा इतिहास सांगितला. ते म्हणाले,”ही बोली इसवीसनाच्या प्रारंभापासून असून त्याचा उल्लेख फार जुन्या ग्रंथातदेखील आढळतो. पूर्वी तिचा उल्लेख ‘कुडाळी’ असा होत असे, पण आता मात्र ती मालवणी म्हणूनच प्रचलित आहे.”यावेळी त्यांनी ‘ कोण कोणाचा देणा लागता’ ही स्वरचित कविता सादर केली. यानंतर स्नेहा नारींगणेकर यांनी आपले विचार मांडले. ” रसाळ फणसासारखी गोड असणारी मालवणी बोली मच्छिंद्र कांबळी यानी साता समुद्रापार नेली. ती कोसाकोसावर बदलते, जातीनिहायही बदलते.” असे त्या म्हणाल्या. प्रभाकर भोगले, शैलेंद्र खडतरे यांचा उल्लेख करीत मालवणीचा अजून प्रसार होण्याचा आशावाद त्यानी व्यक्त केला. सरोज रेडकर यांनी मालवणी साहित्यातील गोडवा, निसर्ग यांचा उल्लेख करीत तसेच ‘घर मोडून माटव कित्याक’, ‘बंद घरातलो चोर’ आदी वाक्प्रचार सांगून श्रोत्यांत गंमत आणली. संकेत येरागी या तरुण गझलकाराने मालवणी विषयीचे प्रेम व्यक्त करीत ‘प्रादेशिक भाषा आपुलकी निर्माण करतात’ असे सांगून आपल्या केरवाड्या विषयी एक मालवणी कविता सादर केली. ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी मालवणी बोली विषयी मालवण्यांचे प्रेम अनेक उदाहरणातून स्पष्ट केले. आपण नवखा असताना आपली मालवणी ऐकून मुंबईत गुं. फ. आजगावकरनी दाखवलेली आपुलकी, मालवणी ऐकण्यासाठी पत्रकार तेंडुलकर आदी दाखवत असलेला जिव्हाळा, थोर साहित्यिक जयवंत दळवी मालवणी विषयी मांडत असलेले विचार आदी गोष्टींचा त्यांनी परामर्श घेतला. मानसी गवंडे यांनी मालवणी मालिकांचा उल्लेख करीत टीव्ही मुळे मालवणी अन्य प्रदेशातही पोचल्याचे आवर्जून सांगितले.
सचिन दळवी यांनी दशावतार नाटकातील संकासूराच्या मिश्किल मालवणीचा उल्लेख करीत या दशावताराचा दासबोध ग्रंथातील संदर्भ सांगितला. डाॅ.मधुकर घारपुरे यांनी ‘राजापूर माडबन येथील गंगाराम गवाणकर यांचेकडून ‘वस्त्रहरण ‘ सारखी अजोड मालवणी कलाकृती निर्माण झाली’ याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर सावंतवाडीचे दत्तप्रसाद गोठोस्कर म्हणाले,” मालवणी ही सारस्वतांनी टिकवल्याचे म्हटले जाते. अनेक लोकांच्या पिढ्या मुलूखापासून दूर गेल्या, तरी ते आजही घरात मालवणी बोलतात. उमेदीच्या काळात आम्हीही मालवणी राष्ट्रभाषा व्हावी असा अनोखा आशावाद बाळगायचो. आजही मी लोकांशी मालवणीत बोलण्याचा प्रयत्न करतो. नवी पिढी मात्र माझ्या मालवणीला मराठीतून उत्तर देते.”
विनय सौदागर यानी चर्चेचा आढावा घेतला व मालवणी साहित्यासाठी अजून एक कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. कट्ट्यावर प्रथमच आलेल्या गोठोस्कर आणि यशवंत गिरी यांचा ‘मायकू’ आणि ‘आनंदाचे डोही’ ही पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अनिता सौदागर, एकनाथ शेटकर, सिंधू दिक्षित व दिलीप पांढरे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.