श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल, लेखक चंद्रकांत बांदेकर यांचे निधन

सावंतवाडी दि.१९ फेब्रुवारी 
येथील संस्थानकालीन आणि १७५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल, लेखक, उभाबाजार येथील रहिवासी चंद्रकांत मोतीराम बांदेकर यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. श्रीराम वाचन मंदिर संस्थेमध्ये ग्रंथपालपद सांभाळल्यानंतर अगदी कमी मासिक वेतनावर गुजराण करतानाच प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी हाती घेतले. १९७० मध्ये त्यांनी ग्रंथपालपदाची धुरा हाती घेतली. त्यानंतरच्या काळात १९७५ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन सावंतवाडी येथे यशस्वी केले. तसेच १९७८ मध्ये या ग्रंथालयाचा शतकोत्तर रोप्य महोत्सव २१ मे ते २८ मे १९७८ या कालखंडात झाला. या सगळ्याच्या संयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ग्रंथालयात येणाऱ्या जाणाऱ्या वाचकांशी त्यांची दिलखुलास अतूट मैत्री असे. त्यांची केबिन नेहमीच सुज्ञ वाचकांनी भरलेली असे. वाचकांशी चर्चा करताना बांदेकर मोकळ्या मनाने आपल्याला जे जे माहित आहे तेथे सांगत राहत. प्रचंड वाचन, संदर्भाची नेमकी जाणीव यामुळे अनेकांना लेखनासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले. चित्रपटांइतकेच त्यांना नाटकांचीही तेवढीच आवड होती. संगीत सौभद्र शारदा, मृच्छकटिक, रायगडला जेव्हा जाग येते, बेईमान, नटसम्राट, गिधाड, काशीराम कोतवाल, रथचक्र, आनंदी गोपाळ, ती फुलराणी, हमीदाबाईची कोठी अशा विविध विषयांवरील नाटकांचा आस्वाद घेऊन तो रसिकांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. १९३९ पासून हजारो गाण्यांची त्यांनी केलेली तपशीलवार नोंद प्रसिद्ध झाली होती. तीस वर्षांच्या आपल्या समृद्ध सेवेमध्ये त्यांनी इमाने इतबारे ग्रंथ सेवा केली. निवृत्तीनंतरच्या काळातही ते लेखन करत राहिले. १९९७ मध्ये ते ग्रंथालयाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर अलीकडच्या काळापर्यंत त्यांनी विविध विषयांवर लेखन केले. आरोग्य, क्रिकेट, अनोखी दुनिया या विषयांवर तितक्यात जाणकारपणे त्यांनी लेखन केले. त्याचबरोबर ‘सुंदरवाडीची वैशिष्ट्ये’ सिंधुदुर्गातील साहित्यिक, नैसर्गिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण टिपणे काढली आहेत.
‘मेमरीज ऑफ कोकण’ हे सदर त्यांनी वृत्तपत्रातून लिहून कोकणातील प्रमुख व्यक्ती, घटना यावर प्रकाश टाकला होता. ‘श्यामसुंदर’ या टोपण नावाने ते लिखाण करायचे. कोकणातील ईरसाल म्हणींचे संकलनही त्यांनी केले होते. कोकणची नवरत्न, कोकण भूषण आणि सुंदरवाडी अशा माहितीचे संकलन त्यांनी केले. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरचे व्यवस्थापक मोतीराम उर्फ अण्णा बांदेकर आणि माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांचे ते काका होत.त्यांच्या निधनाबद्दल श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, डॉ. जी. ए. बुवा, बाळ बोर्डेकर आणि पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.