तळेरे,दि.१२ जानेवारी
कणकवली रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना उद्भवणाऱ्या विविध प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात. यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना- कणकवलीचे अध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी येथील रेल्वे कार्यालयात क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांची भेट घेतली. आणि प्रलंबित मागण्या संदर्भात लेखी निवेदन देऊन चर्चा केली.
कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत गजबजलेले मध्यवर्ती रेल्वे स्थानक असून येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सतत ये जा चालू असते. मुंबईहून येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांना सोईचे होईल. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत असलेल्या प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस गाड्यांचे डिजिटल बोगी दर्शक बोर्ड दर्शविण्यात यावेत.जेणेकरुन प्रवाशांना गाड्यात चढणे सोईचे होईल.
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं.१ वरती संपूर्ण प्रवाशी शेड मंजूर करण्यात यावी. त्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय दूर होईल. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला उपचाराची गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत यासाठी कणकवली रेल्वे स्थानकात रेल्वे हेल्थ केअर युनीट डॉक्टर आणि ॲम्बुलन्स सह उपलब्ध करण्यात यावे. तसेच कणकवली रेल्वे स्थानकावरती जनरल बोगीजवळ सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ती तातडीने करण्यात यावी.त्याचबरोबर तेथे चहा, नारळपाणी स्टाॅल सुरू करण्यात यावा. तसेच कणकवली रेल्वे स्थानकावरती नेहमीच रेल्वे प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. स्थानकावरती बऱ्याचदा एकच खिडकी कार्यरत असल्यामुळे प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. त्यासाठी किमान दोन तिकीट खिडक्या नियमित सुरू ठेवण्यात याव्यात.त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होईल.
अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक गरजेच्या मागण्या रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष नाईक यांनी क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याबाबत सविस्तर चर्चा केली आणि तशा प्रकारच्या मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी रत्नागिरी क्षेत्रिय प्रबंधक कार्यलयाचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई,
कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-उपाध्यक्ष संजय वाडकर, सचिव- साईनाथ आंबेरकर, खजिनदार- गणपत कसालकर, कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-कायदे सल्लागार नंदन वेंगुर्लेकर,सल्लागार सायमन फर्नांडिस, कसाल माजी सरपंच निलेश कामतेकर, समिती सदस्य बाळा सातार्डेकर, वैभववाडी रेल्वेस्थानक संघटनेचेचे महेश रावराणे, किशोर जैतापकर, पंडित रावराणे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे खजिनदार मिहिर मठकर, सदस्य तेजस पोयेकर, सुभाष शिरसाट, मडूरा रेल्वेस्थानक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गुरुदास गवंडे, वसंत धरी, सुरेश गावडे, वेंगुर्ला येथील जाफर शेख आणी कोकण रेल्वेचे अधिकरी उपस्थित होते.