२१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरवात

मालवण,दि.१९ फेब्रुवारी
येत्या २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरवात होत आहे. यात येथील केंद्र क्रमांक ०८२१ या केंद्रावरील विविध शाखेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यबस्था जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रप्रमुख हेमंत साटम यांनी दिली.

यात बारावीच्या विज्ञान, कला, व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व पेपर हे स. का. पाटील सिंधुदुर्ग या महाविद्यालयात होणार आहेत. वाणिज्य शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी या विषयाचा पेपर हा टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय येथे तर उर्वरित पेपर हे सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे होणार आहेत.

परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्यूलेटर तसेच आक्षेपार्ह लिखित साहित्य स्वतः बरोबर ठेवण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कोणताही विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर बोर्डाच्या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

परीक्षेचा विद्यार्थ्यांवर कोणताही ताण येऊ नये व परीक्षा आनंदी वातावरणात पार पडावी यासाठी सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच शहरवासियांनी सहकार्य करावे असे आवाहनही श्री. साटम यांनी केले आहे.