कणकवली,दि.१२ जानेवारी
दिनांक ८ जानेवारी रोजी देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात पडलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण जिल्ह्य़ातील आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. या पावसाचा आंबा मोहोरावर आणि अंतिमतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. म्हणून कालच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.
गेल्यावर्षी आंब्याचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले. आंबा व्यवसायावर अवलंबून असलेले अन्य व्यावसायिक देखील आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेले. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणावर येईल अशी बागायतदारांची अपेक्षा होती. त्यामुळे बागायतदारांनी औषधे, कीटकनाशके, फवारणी, मजूर आदींवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. या मेहनतीला अपेक्षित यश येण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे आंबा बागायतदार काहीसा सुखावला होता.
मात्र दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या आनंदावर सपशेल पाणी पडले आहे. बागायतदार अक्षरशः हवालदिल झाला आहे. या पावसामुळे आंबा मोहोर भिजून गेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंब्यावर बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्यावर डाग पडण्याचीही भीती शेतकऱ्याला वाटत आहे. आतापर्यंत केलेली लाखो रुपयांची गुंतवणूक अशी पाण्यात जाताना पाहून शेतकरी विदीर्ण झाला आहे.
आंबा उत्पन्नावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था विसंबून आहे. बागायतदार यांच्यासह मजूर, औषधे विक्रेते, वाहतूकदार, हमाल असे हजारो लोक आंब्यावर उपजीविका करीत असतात. कालचा पाऊस हा अशा हजारो लोकांसाठी नुकसानकारक आहे. या पावसामुळे आंबा उत्पादक मोठ्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा. राज्य सरकारशी संपर्क साधून तातडीच्या नुकसान भरपाईसाठी आग्रह धरावा आणि अडचणीतील आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना करीत आहे.