वेंगुर्ला, दि .२० फेब्रुवारी
बॅ.खर्डेकर ही महान व्यक्ती होती. त्यांच्या नावाप्रमाणे तुम्ही गुणवत्ता व करिअरसाठी धडपडत आहात. तुम्ही भाग्यवान आहात. हा तुमचा सुनेरी काळ आहे. तुमच्याजवळ टॅलेंट गुणवत्ता व बुद्धिमत्ता आहे. आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवा यश मिळेल. यशाच्या मार्ग सुखकर करून महाविद्यालयाचे नाव रोशन करा असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व जिमखाना डे नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर अर्चना घारे-परब, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, स्थानिक सल्लागार समितीचे बाळू खामकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, विद्यार्थी प्रतिनिधी फाल्गुनी नार्वेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळविल्याबद्दल सौ.घारे-परब यांनी मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गायत्री राणे, उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून फाल्गुनी नार्वेकर, मुंबई विद्यापीठ व्हॉलीबॉल खेळाडू ओंकार गोसावी व हर्ष बोवलेकर यांना चषक व प्रमाणपत्र देऊन, शरिरसौष्ठव स्पर्धेतील ‘सिनिअर खर्डेकर श्री‘ अथर्व पालव व ‘ज्युनिअर खर्डेकर श्री‘ पवन कांबळे यांना प्रमाणपत्र देऊन, ज्युनिअर महाविद्यालयाची विद्यार्थीनी राजकुमारी हिदूस्थानी बगळे हिने रायफल शुटींगमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल सन्मान, महाराष्ट्र स्टुडंटस इनोव्हेशन चॅलेंज २०२३ स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्ह्यातून दुस-या स्तरावर प्रथम दहामध्ये निवड झाल्याबद्दल चैतन्य लाड हिला प्रमाणपत्र देऊन, महाविद्यालयाच्या गेल्या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सानिका वरसकर, मंगल शेणई, सारिकाकुमार यादव, भाग्यश्री केरकर, गौरी गावडे, यासीस मकानदार, प्राची मुळकी यांना प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांचे उडाण महोत्सवात पथनाट्य सादर केल्याबद्दल तसेच हिदी भाषा प्रचार सभा परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे भारतीय राज्य घटनेची प्रत देऊन कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.दिक्षित यांनी, वार्षिक पारितोषिक वितरणाचे वाचन व्ही.एस.चव्हाण यांनी, हिदी भाषा पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, जिमखाना पारितोषिकाचे वाचन क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक यांनी तर आभार प्रा.हेमंत गावडे यांनी मानले.
फोटोओळी – खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून फाल्गुनी नार्वेकर हिला गौरविण्यात आले.