गोपुरी आश्रमात शिवछत्रपतींची जयंती साजरी; जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती
कणकवली दि.२० फेब्रुवारी(भगवान लोके)
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात शिवजयंती विधायक कृतीतून साजरी करण्यात आली. गोपुरी आश्रम कायमच समाजाभिमुख आणि वैचारिक जडणघडणीचे केंद्र राहिला आहे. आजही त्याच उद्देशाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘शिवाजी’… आपण त्याला एकेरी संबोधतो. या एकेरी संबोधण्यावरून अनेकांत मतप्रवाह दिसून येतात. त्यांची सो कोल्ड अस्मिता दुखावते. मात्र ज्यांना आपण जवळचे मानतो त्यांच्याशी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपण बोलतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या काळजात वसलेत! म्हणूनच आपण त्यांना ‘शिवाजी’ म्हणतो. आजचा कार्यक्रम खरंच वैचारिकतेला खतपाणी देणारा होता.
तलवार घेतलेला शिवाजी आपण पाहतो पण नांगर घेतलेला शिवाजी डोळ्यांसमोर कधी येत नाही व आणला जात नाही. आज मुद्दामच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो लोकांसमोर आणला गेला. जिल्ह्यातील अनेक मान्यवर व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत मोरोपंत साकारणारे नंदकुमार पाटील आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. खरी शिवजयंती आणि खरे शिवविचार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर आलेत. ते कायम तसेच जिवंत ठेवूया… शिवाजी नक्की कोण होता हे जाणून घेऊया… असे आवाहनही या कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव विनायक मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, आम्ही भारतीय चळवळीचे कार्यकर्ते ॲड. संदिप निंबाळकर, विनायक सापळे, सुरेश रासम, संतोष कांबळे, ॲड.मनोज रावराणे,नितीन जावळे, बाक्रे मॅडम,नंदू पाटील,डॉ. नितीन शेट्ये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सदाशिव कदम, रौनक पटेल,नितीन मेस्त्री, तेजस्विनी कळसुलकर, ऋषिकेश पाटील, तन्वीर शिरगावकर, अच्युत देसाई, वसुधा माने, कवयित्री सरिता पवार,कवी श्रेयश शिंदे,पर्शुराम झगडे सदाशिव राणे, गुरुप्रसाद तेंडोलकर, बाळकृष्ण सावंत, धीरज मेस्त्री, सुजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.