चांगला मित्र कसा असतो,याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रवीण भोसले होय-मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी,दि.२० फेब्रुवारी 
चांगला मित्र कसा असतो,याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रवीण भोसले होय. त्यांना वडीलांची पुण्याई उपयोगी ठरली,असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.
केसरकर म्हणाले,राजकारणात राहूनही काही माणसे ही नेहमीच जमिनीवर राहतात. त्यातीलच एक म्हणजे प्रविणभाई. अनेक उच्च पदे भूषविली पण कधी आपली तत्वे त्यांनी विसरली नाहीत. तत्त्वाने काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून आजही त्यांच्याकडे बघितले जाते म्हणूनच आज ते सत्तेच्या कोणत्याही पदावर नसतानाही सर्वाना एकत्र घेऊन चालू शकले.

माजी मंत्री प्रविण भोसले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलच्या हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अँड रमाकांत खलप, श्रीमंत खेमसावंत भोसले,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, ईशाद शेख, बबन साळगावकर रविंद्र भोसले, विकास सावंत, सुभाष गोवेकर, व्हिक्टर डॉन्टस, बाबल ठाकूर पुंडलिक दळवी, ॲड.दिलीप नार्वेकर,एस आर सावंत,भगवान देसाई, संजय पडते, रूपेश राऊळ, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, प्रवीण भोसले यांच्या सोबत शालेय राजकीय सामाजिक जीवनात अनेक प्रसंग आम्ही अनुभवले पण नंतरच्या काळात राजकारणात ऐकामेका सोबत राहू शकलो नसलो तरी मैत्रीत कधीही ही खंड पडला नाही. वडील प्रतापराव भोसले यांनी आपल्यावर जे संस्कार केले त्यामुळेच आपण जीवनात तत्त्वाने जगू शकलात. जीवनात राजकारणात अनेक उच्च पदे उपभोगली. मात्र, जेव्हा पदे नव्हती तेव्हा ही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांचा आवडता खेळ क्रिकेट असून जीवनात ही आपले शतक पूर्ण करतील, असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी अर्चना घारे परब म्हणाल्या, प्रवीण भाईंसारखे वडिलांसमान मार्गदर्शक आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. वडिलकीच्या नात्याने ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली. राजकारणात खिलाडूवृत्तीने राहून सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण कसे करावे हे भाईकडून शिकायला हवे. त्यांचे हे आशिर्वाद असेच कायम राहूदे व ते शतायुषी व्हावेत, अशा शब्दांत अर्चना घारे परब यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख संदेश पारकर रविंद्र भोसले, नकुल पार्सेकर, बबन साळगावकर आदिनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवीण भाई प्रेमी उपस्थित होते.