लोरे गावचा सुपुत्र चित्रकार शैलेश गुरव याची रामजन्मभूमीत ‘वाची आर्ट लाईव्ह पेंटिंग’

0

कणकवली दि.१२ जानेवारी(भगवान लोके)

अयोध्या अमृत महोत्सवात ‘वाची आर्ट लाईव्ह पेंटिंग’ कार्यक्रम १४ ते २२ जानेवारी या कालावधीत होत आहे.याठिकाणी कोकणातील कणकवली तालुक्यातील लोरे गावचा सुपुत्र चित्रकार शैलेश मनोहर गुरव याची रामजन्मभूमीत अभिमानास्पद कलासेवा सादर केली जाणार आहे.

लोरे गावचे भूषण चित्रकार शैलेश मनोहर गुरव हे अयोध्येतील परिक्रमा मार्गावर अमृतकाळात लाईव्ह पेंटिंग करतील. अयोध्येतील श्रीराममंदिरात या कलाकृती संग्रहित करण्यात येतील. भारतभरातून निवड झालेल्या २० कलाकारांमध्ये शैलेश याचा समावेश असून या कलाकृतींचे प्रदर्शन अयोध्या येथे भरवण्यात येणार आहे.

भक्ती, संस्कृती आणि कला यांचा अद्भुत संगम भगवान श्रीरामांच्या नगरीत पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम प्राण प्रतिष्ठा समारोहाची सुरुवात होणार आहे. २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा मुख्य समारोह होणार असला तरी सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात आधीच होईल. या प्रसंगी जगद्गुरू राम भद्राचार्य द्वारा संचालित ट्रस्ट रामानंद मिशन तर्फे अयोध्येत ‘अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून वाची आर्ट लाईव्ह पेंटिंग या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जेव्हा जगभरातून राम भक्त अयोध्येत येतील तेव्हा त्यांना वाची आर्ट लाईव्ह पेंटिंगही पाहता येणार आहे. या उपक्रमात २० चित्रकार भाग घेणार आहेत.

“श्रीराम मंदिराचे उदघाटन हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. या निमित्ताने भारतीय कलेचे प्रदर्शन होणे ही अभिमानाची बाब असेल. कलाविश्वात एक वेगळी ओळख असलेल्या २० कलाकारांचा समूह यात सहभागी होणार आहे. कार्यक्रमाच्या अयोजनस्थळी हे कलाकार लाईव्ह पेंटिंग करतील.या उपक्रमाचे संयोजन सुनीता संघाई यांनी केले आहे.