देवगड,दि.२१ फेब्रुवारी
देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई आणि दीक्षित फाउंडेशन आयोजित आणि सह प्रायोजक उमा मिलिंद पवार प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे यांच्या संवादिनी या उपक्रमांतर्गत ‘ओळख स्पर्शाची”या नावाचा प्रशिक्षक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यशाळा शेठ म.ग .हायस्कूलमध्ये दिनांक १९ फेब्रुवारी ते २०फेब्रुवारी आणि दिनांक २१ फेब्रुवारी रोजी अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा येथे विद्यार्थी, शिक्षक ,संस्थाचालक, पालक, वाहन
चालक या सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेली होती.
शिवजयंतीचे औचित्य साधून ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला त्यांना योग्य आदरपूर्वक वागणूक दिली त्याच तत्त्वाचा वापर करून देवगड एज्युकेशन बोर्ड .मुंबई आणि स्थानीय समिती यांच्यामार्फत शिवजयंती अनोख्या पद्धतीने या कार्यशाळेच्या रूपाने साजरी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच ज्ञानप्रबोधिनी मार्फतची ओळख स्पर्शाची ही कार्यशाळा देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील अंजली राइलकर, विशाखा वेलणकर, साधना सेठिया, अमिता बेहेरे, अंजली भिडे हे प्रमुख समुपदेशक लाभले होते. या कार्यशाळेमध्ये दिनांक १९ रोजी शेठ म.ग .हायस्कूल मिलिंद सदानंद पवार प्राथमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक विभाग आणि अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा या शाळांमधील शिक्षक वर्गासाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यामधील फरक कसा ओळखावा, अनोळखी व्यक्तींशी आपण कशा पद्धतीने वागावे स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ,स्वच्छता कशी राखावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे समजून घ्यावे त्यांच्या शंका ,वाढत्या वयाबाबतचे प्रश्न कशाप्रकारे हाताळावेत यासारख्या घटकांचे उत्तम मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये समुपदेशकांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ओळख स्पर्शाची संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी बारा ते दीड या वेळेमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक या वर्गांसाठी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी या समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. आणि दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत वाडा हायस्कूल मधील विद्यार्थी आणि पालक या घटकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यशाळेसाठी देवगड एज्युकेशन बोर्ड ,मुंबई चे उपाध्यक्ष सदानंद पवार मुख्य चिटणीस शंकर धुरी आणि स्थानीय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी स्थानीय समितीच्या उपाध्यक्ष अर्चना नेने व सदस्य अनुश्री पारकर यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्व घटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि हीकार्यशाळा संस्थेने आयोजित केल्याबद्दल पालक वर्गाने संस्थेचे अभिनंदन केले आणि आभार देखील मानले आणि यासारख्या कार्यक्रमांची गरज असल्याचे देखील नमूद केले. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे निवेदन आणि उपस्थित समुपदेशकांना संस्थेबद्दल ची माहिती शाळेतील शिक्षक सागर कर्णिक यांनी करून दिली. आणि आभार मुख्य चिटणीस शंकर धुरी यांनी मानले.