सावंतवाडी,दि.२१ फेब्रुवारी
शेवटच्या गिरणी कामगारांला घरं मिळेपर्यंत राष्ट्रीय मिल मजदुर संघ तुमच्या सोबत आहे. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेवर आक्रोश मोर्चा गिरणी कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये सर्व गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेच्या वतीने येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहामध्ये गिरणी कामगार व वारसांचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी अण्णा शिर्सेकर बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय मिल मजूर संघाचे उपाध्यक्ष सुनील बोरकर, जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शामसुंदर कुंभार, मधुकर घाडी, दिनकर राऊळ, वेंगुल्याचे तालुकाध्यक्ष लॉरेन्स डिसोजा, दोडामार्ग तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुबल, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे,घनश्याम शेटकर ,सत्यवान राऊळ आदी उपस्थित होते.
शिर्सेकर म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने राज्यभरामध्ये गिरणी कामगार व वारसांचे मेळावे घेतले जात असून कोणीही गिरणी कामगार न्याय हक्कापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न चालू आहेत. अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि आम्ही आपल्या सेवेत सदैव कार्यरत आहोत. सरकारसोबत आंदोलने आणि संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून गिरणी कामगारांना न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागतो आहे.गिरणी कामगार व वारसदारांनी सरकारने कायद्याची अंमलबजावणी करावी जरूर तर सुधारित कायदे पास करावेत म्हणून आमची मागणी आहे.
अण्णा शिर्सेकर म्हणाले,केंद्र व राज्य सरकारने देखील गिरणी कामगार वारसांना घरे आणि न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहावे. कामगारांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे त्यासाठी नवीन फॉर्म देखील भरून घ्यावेत ही आमची मागणी असून सरकारने नियोजनबद्ध वेळापत्रक करून कामगारांना घरे द्यावीत कायद्याची अंमलबजावणी करावी मात्र गिरणी कामगार व वारसांनी मिळालेली घरे विकून नये. मुंबईत मराठी माणसाचा टक्का घटत आहे त्यामुळे किंमती घरे विकू नये.
एम एम आर डी ए उपलब्ध पंचावन्न लाख एकर जमिनीवर ताबडतोब घरे बांधा ,बी डी डी चाळ पुनर्विकास गिरणी कामगारांची घरे द्या, मिठागर जागेवर कामगारांना घरे द्या,ट्रांजिस्टर कॅम्प पूर्ण विकसित करून अतिरिक्त घरे कामगारांना द्या, एनटीसी गिरण्यांच्या बंद असलेल्या सर्व गिरण्या वर घरे बांधा, गिरण्या चाळींचा विकास त्या जागेवर करून गिरणी कामगारांना घरे द्या, गिरणी कामगार म्हणून एक जरी पुरावा सापडला तरी तो पात्र माना, मुंबईमध्ये घरे द्या, राहिलेल्या सर्व कामगारांना घराचा फॉर्म भरण्याची संधी द्या अशा मागण्या सर्व गिरणी कामगार संघटनाच्या वतीने गिरणी कामगार कृती संघटना करत आहे असे देखील अण्णा शिर्सेकर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सुनील बोरकर म्हणाले, गिरणी कामगारांनी भारत स्वातंत्र्याची चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेऊन त्याग केला आहे. वास्तविकता गिरणी कामगारांच्या या त्यागाची जाणीव सरकारने ठेवून गिरणीच्या जागेवर घरे बांधून त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे होती परंतु सरकारला आंदोलनाची भाषा समजते. काँग्रेस सरकारने घरे देण्याचा कायदा केला मात्र नंतरच्या भाजपा युती सरकारने घरांची लॉटरी किंवा अन्य बाबतीत ढुंकूनही पाहिले नाही. यासाठी आता आंदोलन उभारले जाणार असून गिरणी कामगार व वारसदारांच्या जनजागृती व्हायला पाहिजे गिरणी कामगारांना घर मुंबईतच मिळाली पाहिजेत असे बोरकर यांनी सांगितले.
सुनील बोरकर म्हणाले,राज्यातील गिरणी कामगारांनी यापुढे उभारलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन एकजूट दाखवावी आणि सरकार वर दबाव आणावा. ज्या लॉटरी काढल्या आहेत त्यांना लवकर घरे मिळावी म्हणून सरकारने पुढाकार घ्यावा. गिरणी कामगार चा दबावगट निर्माण करावा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये गिरणी कामगारांच्या एकही प्रश्नाला न्याय मिळाला नाही.
यावेळी सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शामसुंदर कुंभार यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी सुभाष परब, रेखा लोंढे, प्रवीण परब, प्रकाश मोरजकर, गणपत गावडे, विद्या चिंदरकर ,राजन राऊळ ,शंकर मुळीक, कृष्णराव देसाई, रावजी राणे, विष्णू नाईक, विनायक गुरव,झीलु सावंत, रुक्मिणी सावंत, रवींद्र नाईक, जयदेव शिरोडकर तसेच गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते.यावेळी गिरणी कामगारांनी घोषणा दिल्या.