सावंतवाडी दि.२१ फेब्रुवारी
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. याबाबत प्रदेश काँग्रेस पातळीवर चर्चा झाली आहे असे सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यांच्या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसने लढविण्यासंदर्भात ठराव पास करून प्रदेश काँग्रेसला पाठविला होता.
या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्याकडे सावंतवाडी मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळावा अशी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आग्रही मागणी केली आहे. या मागणीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेससाठी आग्रहने मागण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी बूथ पर्यंतचे संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांनी केले आहे