कुडाळ,दि.२१ फेब्रुवारी
येथील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ २४ तारखेला होत आहे. मात्र त्या ठिकाणी प्रशासनाकडून ठाकरे शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांचे नाव निमंत्रण पत्रिका वरून गायब करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन नाव घालण्यास विसरले की अन्य काही राजकीय कारण? असा सवाल कुडाळ येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
या कोनशिला समारंभाचे उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई ( सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली ) यांच्या मुख्य उपस्थितीत होणार असून यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्गचे हेमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मात्र या शासकीय कार्यक्रमास कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नावाचा या निमंत्रण पत्रिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. मुख्य म्हणजे या कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव नमूद करणे महत्त्वाचे असते. परंतु या निमंत्रण पत्रिकेमध्ये आमदार वैभव नाईक यांचे नाव नसल्याने सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेवर आमदार वैभव नाईक यांचे नाव जाणून-बुजून घालण्यात आले नाही की प्रशासनाला विसर पडला, असा प्रश्न समोर येत आहे