मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने पटकावला

देवगड,दि.२२ फेब्रूवारी
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक , पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा देवगड तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* हा पुरस्कार जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने पटकावला आहे.

रोख रुपये तीन लाख व गौरव पत्र असे प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार प्रशालेस एका कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे .

राज्य शासनामार्फत “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ” योजनेअंतर्गत *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* हे अभियान अलीकडेच राबविण्यात आले.या अभियानात गोगटे प्रशालेने शैक्षणिक गुणवत्ता , अध्ययन / अध्यापन / प्रशासन , यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , शालेय सौंदर्यीकरणा बरोबरच अमृत वाटिका , गांडूळ खत प्रकल्प , पर्यावरण संवर्धनाची जाणीव ,सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता ,चांगले आरोग्य , राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न , व्यवसाय शिक्षण , अंगभूत कला – क्रीडा गुणांचा विकास ,क्षेत्रभेट याहून अधिक घटकांची परिणामकारक अंमलबजावणी केल्याने गोगटे प्रशाला देवगड तालुक्यात प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली ,

प्रशालेला प्राप्त झालेल्या या पुरस्कारा बद्दल संस्थाध्यक्ष ऍड अजित गोगटे , सचिव – प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष – प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक संजय गोगटे यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक , माजी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.