देवगड दि. २१ ( प्रतिनिधी )
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक , पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा देवगड तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने पटकावला आहे.

रोख रुपये तीन लाख व गौरव पत्र असे प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार प्रशालेस एका कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे .

राज्य शासनामार्फत “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ” योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान अलीकडेच राबविण्यात आले.या अभियानात गोगटे प्रशालेने शैक्षणिक गुणवत्ता , अध्ययन / अध्यापन / प्रशासन , यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , शालेय सौंदर्यीकरणा बरोबरच अमृत वाटिका , गांडूळ खत प्रकल्प , पर्यावरण संवर्धनाची जाणीव ,सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता ,चांगले आरोग्य , राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न , व्यवसाय शिक्षण , अंगभूत कला – क्रीडा गुणांचा विकास ,क्षेत्रभेट याहून अधिक घटकांची परिणामकारक अंमलबजावणी केल्याने गोगटे प्रशाला देवगड तालुक्यात प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली ,

प्रशालेला प्राप्त झालेल्या या पुरस्कारा बद्दल संस्थाध्यक्ष ऍड अजित गोगटे , सचिव – प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष – प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक संजय गोगटे यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक , माजी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.