मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेत भरला शालेय आठवडी बाजार

मालवण,दि.२२ फेब्रुवारी

मालवण एज्युकेशन सोसासायटी संचालित मालवण येथील मोहनराव महादेव परुळेकर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व व्यवहार ज्ञान कळावे या दृष्टीने शालेय आठवडी बाजार भरविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ, भाज्या, सुके मासे, मालवणी मेवा, शीतपेय यासह दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. यावेळी पालक व ग्राहकांनी या शालेय आठवडी बाजारास भेट देऊन खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यवहार ज्ञान कळावे, नफा तोटा शिकता यावा तसेच सहकार्य, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची जोपासणूक करता यावी या उद्देशाने मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेत हा शालेय आठवडी बाजार भरविण्यात आला. या आठवडी बाजाराचे उदघाटन मुख्याध्यापिका सौ. गोसावी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिक्षिका सौ. पेंडुरकर, सौ. कवटकर, सौ. चव्हाण, सौ. कुलकर्णी, सौ. प्रभूखानोलकर, सौ. यादव, शिक्षक श्री. बनसोडे, श्री. सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.

या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ, लाडू, काजुगरसहित मालवणी खाद्य मेवा, भाज्या व फळे, सुके मासे, गावठी अंडी, पाणी बॉटल, शीतपेये, पाणी पुरी असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस मांडल्या होत्या. तसेच बॅनर लावून व आरोळ्या देऊन आपल्या मालाची जाहिरातही केली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर ग्राहकांनी या बाजारात खरेदी करून उत्तम प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिले.