मालवण,दि.२२ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्हयातील २५ हजार गुंतवणूकदारांनी मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या सर्व गुंतवणूकदारांनी गेल्या आठ वर्षांपासून परतावा मिळण्याची मागणी करुनही परतावा मिळत नसल्याने शासनाने कंपनीवर कायदेशीररित्या कारवाई करुन लवकरात लवकर गुंतवणूकदारांना परतावा मिळवून द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा
सिंधुदुर्ग जिल्हयातील मैत्रेय असोसिएशनने एका निवेदनाव्दारे दिला आहे मैत्रेय असोसिएशनने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी निवेदन दिले
महाराष्ट्रासह इतर राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त जनतेने सुमारे दोन हजार आठ कोटीची गुंतवणूक मैत्रेय कंपनीमध्ये केलेली आहे. या मैत्रेय कंपनीविरुद्ध अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे २०१६ मध्ये दाखल झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील लोकांनीही या कंपनीमध्ये मोठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. परंतु ती परत मिळत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मैत्रेय असोसिएशनमार्फत सर्व गुंतवणूकदारांना एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केल्यानंतर काल ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे १०० हून अधिक मैत्रेयचे गुंतवणूकदार एकत्र आले. यामध्ये असोसिएशनचे पदाधिकारी ललिता राऊत, उष:कला केळुसकर, लक्ष्मी केळुसकर, गया ढोके, दीपिका तुळसकर, आनंद करंगुटकर, गणपत केळुसकर, जहीर शेख, शेखर कोचरेकर, यासिन सय्यद, गणपत शेलटकर यांच्यासह गुंतवणूकदार उपस्थित होते.
मैत्रेय कंपनीकडून गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने एकत्र आलेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना तीव्र भावना व्यक्त केल्या. कंपनीकडून परतावा घेण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करुन आर्थिक गुन्हे शाखेमार्फत पोलिसांकडून कारवाई सुरू केलेली आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयातही पोलीस खात्याने मैत्रेय कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांना भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली.