कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने पत्रादेवी आरोसबाग फाट्यावर स्विफ्ट डिझायर कार मधून गोवा बनावटीच्या दारूसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा ,दि.२२ फेब्रुवारी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने आज बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात धडक कारवाई केली. पत्रादेवी आरोसबाग फाट्यावर स्विफ्ट डिझायर कार मधून ४ लाख ३० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. दारू वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ६ लाख रुपयांची कार ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी पंढरी रजनीनाथ सावंत (४५, रा. डिगस, ता. कुडाळ) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूर भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा पत्रादेवी रस्त्यावर आरोसबाग फाटा येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एमएच ०७ क्यू ३१०४) ची तपासणी केली असता त्यात ६७ दारूचे बॉक्स आढळून आलेत. त्याची किंमत ४ लाख ३० हजार ८०० रुपये व ६ लाख रुपयांची कार असा एकूण १० लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, वाय. एन. फटांगरे, कॉन्स्टेबल अमोल यादव, सुशांत बनसोडे, विलास पवार, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.