मातोंड येथे २५ फेब्रुवारीला बारस उत्सव

वेंगुर्ले,दि.२३ फेब्रूवारी

मातोंड श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानची ‘स्थळाची’ बारस रविवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. १४ वर्षांपूर्वी गावात कुळाची बारस झाली होती. तर तब्बल ३५ वर्षांनी ही स्थळाची बारास होत आहे. त्यामुळे गावातील वातावरण भक्तीमय असून समस्त गावकर मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे चोख नियोजन करण्यात आहे.
पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते, उपचाराची साधने नव्हती, अशावेळी सामूहिक गोंधळ घालून उपासना करण्याची प्रथा होती. “बारस” हा शब्द त्यापासूनच रूढ झाला आहे. गावातील वाईट शक्ती, त्रास, अन्याय, भूत पिशाच्य, रोगराई, दुःख यांचे निवारण एकाच व्यासपीठावर होते, ती म्हणजे “बारस”! हा एकप्रकारे देवीचा गोंधळ आहे. देवीच्या आसपास असलेल्या सुप्त शक्ती यावेळी जागृत असतात. तेजोमय असा तो दिवस असतो. सर्व दैवी शक्तींचा समूह या आराधनेतून तयार झालेला असतो, आणि त्यामुळेच तर “बारस” या उत्सवात अनिष्ट शक्ती आपोआप पुढे येतात. त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा हा विधी! मातोंड गावात पुन्हा एकदा १४ वर्षांनी हा योग जुळून आलाय.
मातोंड गावात बारशीला अनेक पिढ्यांचा इतिहास आहे. १९८२ च्या दरम्यान मातोंडमध्ये कुळाची बारस झाली होती. या बारशीचे दोन प्रकार आहेत. स्थळाची आणि कुळाची…२०१० मध्ये कुळाची बारस झाली होती. आता या वर्षी स्थळाची बारस होत आहे. आत आणि बाहेर असे प्रकार आहेत. बारशी दिवशी अनेक धार्मिक विधी असतात. या काळात देवीच्या शक्ती लहरी अधिक तीव्र असतात, त्यामुळे एखाद्याने प्रार्थना केल्यास त्याचे फळ त्याला मिळते, अशी श्रद्धा आहे .आणि म्हणूनच “बारस” म्हटली कि हजारो भाविकांचा जनसागर लोटतो. मातोंड गाव कित्येक वर्षे हि परंपरा जोपासत आहे. तरी या उत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी मातोंड यांनी केले आहे.

असे असेल नियोजन –
या बरशी निमित्त समस्त गावकर मंडळी, युवक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे. मंदिराला सभोवताली मंडप घालण्यात आला आहे तर मंदिराच्या बाहेर स्वागत कक्ष उभारण्यात आला आहेत. यालाच लागून मातोंड गावाला लागून असलेल्या गावातील प्रमुख गावकर मंडळी म्हणजेच “शिमदाडे” व विविध गावातील गावकर मंडळी यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मातोंड हायस्कूल व श्री रामेश्वर मंदिर नजीक चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हा कार्यक्रम सर्व भाविकांना पाहता यावा यासाठी ३ मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात आली आहे.