८०० मीटर धावणे मध्ये सुवर्ण तर १५०० मीटर मध्ये रौप्य पदक पटकाविले
आचरा,दि.२३ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
: आचरेतील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीचा बोलबाला राष्ट्रीय स्पर्धेतदेखील कायम राहिला आहे. अश्वमेधमध्ये मेंटॉरची भूमिका पार पाडणाऱ्या चंद्रकला प्रमोद सातपुते यांनी गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल मास्टर गेम गोवा या राष्ट्रीय स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी बजावली. त्यांनी एका रौप्य पदकासह दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.
गोवा येथे नॅशनल मास्टर गेम ही राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक स्पर्धा पार पडली. ४० वर्षाखालील महिला गटातून चंद्रकला सातपुते यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सातपुते यांचे १५०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात एका सेकंदाने सुवर्णपदक हुकल. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र त्यानंतर झालेल्या ८०० मीटर धावणेमध्ये त्यांनी थेट सुवर्ण पदक खेचून आणत जोरदार कमबॅक केला. त्यानंतर महाराष्ट्र संघाकडून रिले या क्रीडा प्रकारात खेळताना सुवर्ण पदकाची कमाई केली.
सातपुते या आचरेतील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने सराव करत आहेत. याआधी त्यांनी कणकवली मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत धावपटू म्हणून नवी ओळख निर्माण केली. सातत्यपूर्ण केलेला सराव आणि जिंकण्याची जिद्द याची सांगड त्यांनी घातली. त्यांना मुख्य प्रशिक्षक अनिकेत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीसाठी सातपुते यांनी गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल संचालक सिद्धेश आचरेकर यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक स्पर्धा खेळणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. कुटुबियांची योग्य साथ मिळाल्याने मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकले. १५०० मीटर धावणेमध्ये एका सेकंदाने सुवर्णपदक हुकले तेव्हा खूप निराश झाले. मात्र ८०० मीटर धावणे स्पर्धेत मी कमबॅक करेन, असा विश्वास होता. तगडे स्पर्धक असताना मी सुवर्ण पदकाची मानकरी होऊ शकले, याचे श्रेय माझ्या मार्गदर्शकांना जाते, अशी प्रतिक्रिया चंद्रकला सातपुते यांनी दिली. सातपुते या पशू वैद्यकीय अधिकारी (बिडवाडी) प्रमोद सातपुते यांच्या पत्नी आहेत.