आंबोलीचे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर-खासदार विनायक राऊत

आंबोली दि.२३ फेब्रुवारी
आंबोलीचे सौंदर्य संपविण्यासाठी राजकीय आश्रयाने शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम होत आहेत त्याबाबत चौकशी करून हिरण्यकेशी, आंबोलीचे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून उद्या शनिवार दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी सर्व अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून याबाबत आंदोलकांची बाजू मांडली जाईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी मागील नऊ दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण स्थळी आंबोली येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता नागरिकांना दिली
जिल्हाधिकारी यांना आपण एक पत्र लिहून उद्या शनिवारी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याबाबत निर्देश द्यावे असे कळविले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी बोलताना सांगितले.
आंबोली येथे शासकीय जमिनीवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी केली पाहिजे.आंबोली येथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे सुमारे २५ बंगले बांधण्याचे काम सुरु आहे. आंबोली ग्रामस्थांनी या संदर्भात अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मागील ९ दिवसापासुन शेकडींच्या संख्येने ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
आंबोली येथे खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रांत सावंतवाडी, उपवनसंरक्षक सावंतवाड़ी, व अधिक्षक अभियंता विज वितरण कंपनी यांच्यासमवेत उ‌द्या शनिवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष पाहणी करु इच्छितो, असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री खासदार विनायक राऊत यांनी मागील नऊ दिवसापासून सुरू असलेल्या आंबोली उपोषण स्थळी भेट दिली यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना म्हटले आहे, आंबोलीत राजकीय पाठबळावर शासकीय जमिनीमध्ये अनधिकृतपणे धनदांडग्यानी २५ बंगले बांधले आहेत .गोरगरिबांनी शासकीय जमिनीत काही केले तर हातोडा मारला जातो आणि श्रीमंतांनी काय केलं तर पाठिंबा दिला जातो अशा राजकीय धन दांड्यांना न घाबरता नागरिक लढा देत आहे त्याचेच आपल्याला समाधान वाटते असे खासदार राऊत यांनी चर्चे दरम्यान सांगितले.
आंबोली पर्यटन क्षेत्र, वनखाते , कबुलायतदार जमीन संरक्षित आहे. या जमिनीवर अनधिकृत पणे इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे या साऱ्या प्रकरणाची चौकशी करताना वीज मंडळाने कोणत्या अधिकारात वीज कनेक्शन दिलं ? या साऱ्याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधिता विरोधात कारवाई व्हावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलकांशी चर्चा करताना सांगितले.