सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी
गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने विधानसभेवर येत्या मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मध्ये जयश्री खाडिलकर पांडे, जयप्रकाश भिलारे, गोविंदराव मोहिते, जयवंत गावडे, नंदू पारकर, जितेंद्र राणे या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांनी दिली.
अण्णा शिर्सेकर म्हणाले,एम एम आर डी ए उपलब्ध पंचावन्न लाख एकर जमिनीवर ताबडतोब घरे बांधा ,बी डी डी चाळ पुनर्विकास गिरणी कामगारांची घरे द्या, मिठागर जागेवर कामगारांना घरे द्या,ट्रांजिस्टर कॅम्प पूर्ण विकसित करून अतिरिक्त घरे कामगारांना द्या, एनटीसी गिरण्यांच्या बंद असलेल्या सर्व गिरण्या वर घरे बांधा, गिरण्या चाळींचा विकास त्या जागेवर करून गिरणी कामगारांना घरे द्या, गिरणी कामगार म्हणून एक जरी पुरावा सापडला तरी तो पात्र माना, मुंबईमध्ये घरे द्या, राहिलेल्या सर्व कामगारांना घराचा फॉर्म भरण्याची संधी द्या अशा मागण्या सर्व गिरणी कामगार संघटनाच्या वतीने गिरणी कामगार कृती संघटना करत आहे.
कोकणातील गिरणी कामगार व वारसांनी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन सरकारला जाब विचारण्यासाठी एकजूट दाखवावी असे आवाहन अण्णा शिर्सेकर यांनी केले.