ठाकरे शिवसेनेच्या ‘प्रथम ती मालवण सौभाग्यवती’ स्पर्धेत सौ. केतकी सावजी विजयी

सौ. श्वेता जोशी द्वितीय तर सौ. अश्विनी आचरेकर तृतीय विजेत्या

मालवण,दि.२३ फेब्रुवारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण बंदर जेटी येथे संपन्न झालेल्या प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धेत सौ. केतकी सावजी यांनी बाजी मारत विजेतेपद पटकाविले. तर द्वितीय क्रमांक सौ. श्वेता जोशी यांनी तर तृतीय क्रमांक सौ. अश्विनी आचरेकर यांनी मिळविला.

ठाकरे शिवसेनेच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडीतर्फे मालवण बंदर जेटी येथे प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा तसेच हळदीकुंकू समारंभ, फनी गेम्स व लकी ड्रॉ चे आदी कार्यक्रम बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत व उत्साहात संपन्न झाले. या स्पर्धेच्या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, मंदार शिरसाट, गीतेश राऊत, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, भाई कासवकर, महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, उपजिल्हा संघटक, सेजल परब, युवतीसेना कुडाळ मालवण समन्वयक शिल्पा खोत, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात शिवसेना, महिला आघाडी व युवतीसेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यापुढेही दरवर्षी महिलांसाठी अशाप्रकारची स्पर्धा घेण्यात येईल. मी आणि आम. वैभव नाईक हे येथील मतदार संघात नेते किंवा पुढारी म्हणून वावरट नाही, जिल्हावासियांचे आपले माणूस म्हणून राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कोकणची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले असून हे भाग्य बाळासाहेब ठाकरे व येथील जनतेच्या मायेमुळे मिळाले आहे, असेही खास. राऊत म्हणाले. तर आमदार वैभव नाईक म्हणाले, महिलांमध्ये अनेक कलागुण असतात. रोजच्या संसारिक जीवनातून महिलांनी घराबाहेर पडावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतूने आजची स्पर्धा आयोजित केली आहे. महिलांनी आपला आनंद कशात आहे याचा विचार करावा आणि त्या आनंदात सहभागी व्हावे, असेही आम. नाईक म्हणाले. यावेळी अरुण दूधवडकर व हरी खोबरेकर यांनीही विचार मांडले.

प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धेत २० सौभाग्यवतीनी सहभाग घेतला. यात पारंपारिक वेशभूषा फेरी तसेच मनपसंद पेहराव व परीक्षक प्रश्नोत्तर फेरी पार पडली. यावेळी सहभागी महिलांनी आकर्षक पेहराव परिधान करून रॅम्पवॉक करत तसेच प्रश्नांना हसतखेळत उत्तरे देत स्पर्धेत रंगत आणली. यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे स्मार्ट टीव्ही, एअर कुलर व मिक्सर अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सौ. सुमेधा नाईक व मनाली कुडतरकर यांनी केले. स्पर्धेचे निवेदन बादल चौधरी व ऋत्विक धुरी यांनी केले.

यावेळी मालवण मधील महिला वकिलांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये प्रथम सौ. वैशाली शंकरदास, द्वितीय सौ. जान्हवी सावजी, तृतीय सौ. स्मिता घाडीगावकर या भाग्यवान विजेत्या ठरल्या, त्यांना अनुक्रमे सोन्याची नथ, गॅस शेगडी व सिलिंग फॅन अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर यावेळी आयोजित फनी गेम्स मधील विजेत्या महिलांनाही गौरविण्यात आले.

यावेळी श्वेता सावंत, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, विद्या फर्नांडिस, अंजना सामंत, नीना मुंबरकर, मंदा जोशी, स्नेहा शेलटकर, सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, आर्या गावकर, भारती आडकर, संजना रेडकर, मानसी कुर्ले, पायल आढाव, तसेच सन्मेष परब, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.