मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश;रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांची आत्महत्या?
कणकवली दि.२४ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली रेल्वे ट्रॅक वर काल (शुक्रवार)सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता.त्यानुसार कणकवली पोलिस व रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर चौकशी करत रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात एक इसम रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसला होता. त्याची रिक्षा रेल्वे स्थानक वाहनतळावर पार्क केली होती. पोलिसांनी नातेवाईकांना संपर्क करून माहिती दिली असता त्यांनी कणकवली येथे येऊन मृतदेह , कपडे व चप्पल पाहिल्यानंतर ओळखले. त्यामुळे तो मृतदेह रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय गणपत घाडी (वय ४३)यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तातोबा घाडी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,असलदे येथील तातोबा उर्फ अजय गणपत घाडी हे काल शुक्रवारी दुपारी घरामधून रिक्षा घेवून दुपारी ३ वाजता नेहमीप्रमाणे नांदगाव रिक्षा स्टँड येथे गेले होते.मात्र,६ वाजले तरी ते घरी आले नाही.त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आजारी असलेल्या एका मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी त्यांना फोन लावला तर त्यांचा मोबाईल बंद येत होता.त्यानंतर कणकवली रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रिक्षा उभी असल्याचे ग्रामस्थ व पोलिसांनी कळवले.त्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक कणकवली येथे आले. भाऊ मारुती घाडी यांना पहिल्यांदा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात नेले. तिथे असलेला मृतदेह,पिवळा रंगाचा शर्ट आणि चप्पल यांच्यावरून तो आपलाच भाऊ तातोबा घाडी असल्याचे लक्षात आले.तसे त्यांनी पोलिसांना सांगितले.
रिक्षाचालक तातोबा घाडी यांनी रेल्वे स्थानक वाहन तळावर रिक्षा उभी केली होती,त्या ठिकाणी पोलिसांनी मोबाईल,रिक्षेची चावी,ओळखपत्र,रोख रक्कम आढळली आहे.
दरम्यान,कणकवली पोलिसांनी भाऊ मारुती गणपत घाडी यांचे जबाब नोंदविले आहेत.सकाळी मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात असलदे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी रात्री रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके,व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर,बाबाजी शिंदे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
अजय घाडी हे प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून परिचित होते.नांदगाव तिठा येथे ते रिक्षा व्यवसाय करीत असायचे.त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सन्मित्र रिक्षा संघटनेने आज रिक्षा बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा,मुलगी ,दोन भाऊ असा परिवार आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,पोलिस हवालदार विनोद सुपल,चंद्रकांत झोरे करीत आहेत.