मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथील गार्डन सध्या डासांचे उत्पत्ती स्थान-माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

मालवण, दि.२४ फेब्रुवारी

मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथील गार्डन सध्या डासांचे उत्पत्ती स्थान बनले आहे. गेली दीड वर्षे या गार्डन मधील रंगीत कारंजाही बंद आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या फोवकांडा पिंपळ येथे मालवण नगरपालिकेचे गार्डन आहे. आमच्या कालावधी मध्ये या गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले. यामध्ये रंगीत कारंजा, डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आल्या. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गार्डन असल्याने पर्यटनदृष्ट्या सौदर्य वाढविणारे आहे. परंतु हेच गार्डन मागील दीड वर्षांपासून समस्याग्रस्त बनले आहे. रंगीत कारंजाही बंद आहे. आता तिकडे कारंज्याच्या साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या तयार झाल्या आहेत. प्रवेशद्वारही गेट मोडले आहे. लावलेल्या डेकोरेटिव्ह लाईटही बंद आहेत. याबाबत मागील दीड वर्ष आवाज उठवूनही काहीही कार्यवाही झालेली नाही असे श्री. कांदळगावकर यांनी सांगितले.

एकीकडे आपल्या जिल्ह्यातील नगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बक्षीस मिळवत असताना मालवण नगरपालिका सुशेगाद आहे आणि ती मालवणच्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. धूर फवारणी, औषध फवारणी करून डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट करणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नाही. उलट सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी अस्वच्छता होताना दिसत आहे. या ठिकाणची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा अंकुश नाही. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसत नाही. सध्या या ठिकाणी फोवकांडा रिक्षा मंडळाकडून स्वयंस्फूर्तीने देखभाल सुरु आहे.

फक्त एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट करायचे. त्यामध्ये नागरिकांना, सामाजिक संस्थांना सहभागी करून घेऊन फक्त शासनाला दाखविण्या इतपत फोटो सेशन करून घेतले जात आहेत. एखाद्या कामाबाबत मागील दीड वर्षांपासून सातत्याने सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मुख्याधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हे सिद्ध होत असल्याचा आरोप श्री. कांदळगावकर यांनी केला आहे.

आम्ही केलेल्या सूचनांची कात्रण करून फाईलला लावण्यापेक्षा केबिन सोडून जर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असती तर आमच्या काळात सुशोभीकरण केलेल्या एका गार्डनची अशी वाताहत लागली नसती अशी खंतही श्री. कांदळगावकर यांनी व्यक्त केली आहे.