मालवण, दि.२४ फेब्रुवारी
आठ दिवसांपूर्वी आगीत घर जळून भस्मसात झाल्यानंतर संसार उघड्यावर पडलेल्या देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत आणि त्यांची वृद्ध पत्नी सौ. गुलाब रामचंद्र सामंत या वृद्ध दाम्पत्याची भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी भेट घेतल्यानंतर या कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे आणि आपल्या माध्यमातून ५० हजाराची मदत दत्ता सामंत यांनी सुपूर्द केली आहे . या कुटुंबाला उभं करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
देवबाग मधील सामंत यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घरात वयोवृद्ध सामंत कुटुंबीय आपल्या मुली समवेत राहते. या आगीच्या दुर्घटनेमुळे हे दांपत्य उघड्यावर आले आहेत. घराबाजूच्या एका पडवीत त्यांचा संसार सुरु असून थंडी वाऱ्यामध्ये हे कुटुंब उघड्यावर आले आहे. याची माहिती मिळताच भाजपा नेते दत्ता सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुर्घटनेची माहिती घेऊन या कुटुंबाला उभे करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ५० हजाराची मदत त्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच तात्या बिलये, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, संतोष पालव, नादार तुळसकर, मकरंद चोपडेकर, दिनेश कासवकर, जीत चोपडेकर, तुकाराम तांडेल, गणेश पेडणेकर, गणेश मोंडकर, आशु तोरसकर, ग्रा.पं. सदस्या अपर्णा धुरी, पास्कू ब्रीद, पीटर लुद्रिक, विलास बिलये, मंदार धुरी, बाबू कासवकर यांच्यासह भाजपाचे अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या श्री. लोणे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचाराबाबत दत्ता सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी फोन वरून चर्चा केली.