रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने सलग१४ व्या वर्षी कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेशोत्सव सात दिवस साजरा

यानिमित्त संगीत भजने, भजनबारी, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

मालवण, दि.२४ फेब्रुवारी

भाजपचे स्थानिक नेते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने सलग १४ व्या वर्षी कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित करण्यात आलेला माघी गणेशोत्सव विविधांगी कार्यक्रमांनी सात दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त संगीत भजने, भजनबारी, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सातही दिवस महाप्रसाद ठेवण्यात आला होता. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. शेवटच्या दिवशी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या सौजन्याने भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांचे भजन आयोजित करण्यात आले होते. या सुश्राव्य भजनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर साजरा होणारा माघी गणेशोत्सव जिल्ह्यातील नावाजलेला उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवानिमित्त दरवर्षी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी ते सोमवार दि. १९ फेब्रुवारी या कालावधीत सात दिवस हा माघी गणेशोत्सव संपन्न झाला. सोमवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग “उध्दार झाला वारुळाचा अर्थात नागपंचमी’ संपन्न झाला. तर दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ कुडाळ यांचा “भेद शिवपिंडीचा जन्म कालरात्रीचा अर्थात मृत्यू रुद्राणी” हा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरुवारी १५ फेब्रुवारीला सकाळी याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, ललित चव्हाण, मयु पारकर, वसंत गावकर तसेच मंदार लुडबे, संजीवनी लुडबे, करिश्मा लुडबे, अरुणा खाजणवाडकर, आशा लोके, मनिषा गांवकर, पुनम लोके, निता लोके, संदीप लुडबे, राहुल नरे, अक्षय नरे, शैलेश लुडबे, भाई मांजरेकर, बाबु गावकर, गौरव तळगांवकर, दाजी गोसावी, दिपु माडये, प्रसाद देऊलकर, ओमकार लुडबे, समिर चव्हाण, जगदिश अशोक, किशोर चव्हाण, तन्वी लुडबे, मंगल तळगांवकर, भाई चव्हाण, रवी चव्हाण, पप्पु लुडबे, मुन्ना लुडबे, विराज लुडबे, कांता लुडबे, आदित्य लुडबे, उदय लुडबे यांच्यासह मंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री याठिकाणी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा “ब्रम्हपदार्थ अर्थात महिमा जगन्नाथपुरीचा” हा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.

१६ फेब्रुवारी रोजी याठिकाणी हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. तर रात्री दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा “पुत्र भक्षिती मांस आईचे निर्माण वृषचिक राशीचे” हा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत स्वरा पावसकर, समर्थ गवंडे प्रथम

शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या लहान गटात स्वरा पावसकर, निधी खडपकर आणि अभंग रगजी यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळवले. तर मोठ्या गटात समर्थ गवंडे, नेहा जाधव आणि मृणाल सावंत यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. लहान गटात प्रथम तीन क्रमांकांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये तर मोठ्या गटात ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

रविवारी १८ फेब्रुवारी रोजी याठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तर रात्री श्री देवी प्रासादिक भजन मंडळ, देवगड (बुवा संदीप लोके, पखवाज योगेश सामंत) विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ कुडाळ (बुवा गुंडू सावंत, पखवाज विराज बावकर) यांच्यात जंगी भजनबारी सामना आयोजित करण्यात आला होता. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या सौजन्याने भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांचे भजन आयोजित करण्यात आले होते. तर सायंकाळी श्रींची विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.