सावंतवाडी,दि.१३ जानेवारी
कोकणामध्ये भात पिकाखालील क्षेत्र हे जवळपास ४.५० लाख हेक्टर वरून मागील काळात ३.७९ लश्व हेक्टर पर्यंत खाली आले आहे. शेती कामासाठी मजूरांचा तुटवडा व यांत्रिकीकरणाचा अभावामुळे यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या “सिंधुरत्न समृदध योजने अंतर्गत मा. मंत्री दिपक केसरकर, अध्यक्ष, सिंधुरत्न समृद्ध योजना, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अन्न सुरक्षा दल (फुड सिक्युरीटी आर्मी) व यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
सदर योजनेची सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शेतीच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करणे, अल्प व अत्यल्प भुधारकांसाठी भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला पीके, बांबू इत्यादी शेतीच्या विविध कामांसाठी यांत्रिकीकरणाला बळ देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रे अवजारांचा वापर वाढविणे व कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही उद्दीष्टे आहेत.
या योजनेंर्तगत एकूण ८२ प्रशिक्षणार्थीना कृषि संशोधन केंद्र, मन्नुत्थी, थ्रिसुर, केरळ येथे २० दिवसाचे संपूर्ण कृषि यांत्रिकीकरण या विषयावरील प्रशिक्षण, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे जुन्या आंबा बागांचे छाटणीच्या माध्यमातून शास्त्रीय पुनरुज्जीवन या विषयावर ५ दिवसांचे प्रशिक्षण आणि वनशास्त्र महाविद्यालय, डॉ. बा.सा. को.कृ.वि, दापोली येथे बांबुपासून फर्निचर, अगरबत्ती, बांबू पट्टया, हस्तकलेच्या वस्तू निर्मिती या विषयांवर १० दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यापैकी २१ प्रशिक्षणार्थीची पहिली बॅच कृषि संशोधन केंद्र, मन्नुत्थी, थ्रिसुर, केरळ येथे २० दिवसाचे संपूर्ण कृषि यांत्रिकीकरण या विषयावरील प्रशिक्षण घेण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण २० नोव्हेंबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरु आहे. यामध्ये वेगवेगळी भात लावणी यंत्र, त्याकरीता लागणारी चटई रोपवाटीका, पॉवर टिलर, मिनी ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर, भात कापणी यंत्र, पॉवर स्पेअर, ब्रश कटर, नारळाच्या झाडावर चढण्याचे यंत्र, ट्रॅक्टरवर चालणारी शेतीची अवजारे यांची देखभाल, दुरुस्ती आणि वापर यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच दि. ३ ते ७ सप्टेंबर २३ या कालावधीत ४१ प्रशिक्षणार्थीना उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे जुन्या आंबा बागांचे छाटणीच्या माध्यमातून शास्त्रीय पुनरुज्जीवनया विषयावर ५ दिवसांचे प्रशिक्षण आणि दि. ४ ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधी २१ प्रशिक्षणार्थीना वनशास्त्र महाविद्यालय, डॉ. बा.सा.को.कृ.वि, दापोली येथे बांबुपासून फर्निचर, अगरबत्ती, बांबू पट्टया, हस्तकलेच्या वस्तू निर्मिती या विषयांवर १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उर्वरीत प्रशिक्षणार्थीना माहे डिसेबर २०२३ ते माहे मार्च २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चालू वर्षामध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर मशिनने भात लावणी, कापणी व झोडणीची एकूण ४२ प्रात्यक्षिके घेण्यात आली तसेच जुन्या आंबा बागांचे छाटणीच्या माध्यमातून शास्त्रीय पुनरुज्जीवनाची प्रात्यक्षिके घेण्याचे नियोजन केले आहे.