धाडसाचे कौतुक! बांदा येथे विहीरीत पडलेल्या पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या युवकाचा सत्कार

बांदा दि.२५ फेब्रुवारी 
बांद्यात मागच्या आठवड्यात कोल्हापूर येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला शुभम रमेश भोसले (रा.इचलकरंजी,कोल्हापूर) हा युवक पुन्हा इचलकरंजी येथे परतत असताना त्याचा इतर मित्रांशी वाद झाला. यावेळी मित्रांनी त्याला बांदा,गडगेवाडी येथे गाडीतून खाली उतरवले व सर्वजण इचलकरंजी येथे जाण्यासाठी रवाना झाले. शुभम नशेत चालत गवळीटेंबवाडी येथे पोहोचला व अंदाज न आल्याने तो पन्नास फूट खोल असलेल्या शेत विहिरीत कोसळला. त्याने आरडाओरडा केल्याने तेथील स्थानिक युवक साईश सावंत याने याबाबत स्थानिकांना खबर दिली. तेव्हा सर्व स्थानिक तेथे गोळा झाले. यावेळी गवळीटेंब येथील सर्वेश राजन नाईक हा युवक प्रसंगावधान राखत, जीवाची पर्वा न करता खोल विहिरीत उतरला व दोरीच्या सहाय्याने शुभम यास बाहेर काढले. त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या धाडसाची दखल घेऊन गवळीटेंब वाडीतील नागरिकांकडून आज सर्वेश नाईक याचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांकडून त्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.आपल्या वाड्यातील तरुण युवकांनी अशा प्रकारे पुढे येऊन सामाजिक कार्यात आपला हातभार लावला पाहिजे व नवीन आदर्श निर्माण करायला पाहिजे. असे महादेव सावंत यांच्याकडून याप्रसंगी सांगण्यात आले. तसेच अशा कोणत्याही सामाजिक कार्यासाठी मदतीस आपण सदैव हजर आहे असे आश्वासन श्री भाऊ वळंजु यांच्याकडून देण्यात आले.आपल्या वाड्याची एकी सदैव अशीच टिकवुन ठेवुया व वाड्यातील प्रत्येक समस्या एकत्र येत, सामाजिक पुढाकार घेत सोडवुया असे श्री गुरु कल्याणकर यांचेकडून सांगण्यात आले.
यावेळी महादेव सावंत, भाऊ वळंजु,उमेश तोरसकर, कृष्णा देसाई, गुरुनाथ नार्वेकर सर,गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,विराज उर्फ बबलु देसाई, व्यंकटेश उरुमकर,भैय्या सावंत, शैलेश सावंत,प्रकाश निगुडकर,ओंकार सावंत,टिकु कुमार,विष्णु निगुडकर,राजन नाईक,हरेष मळगावकर,सतिश शेटकर,आदी नागरिक उपस्थित होते.