वैभववाडी, दि.२५ फेब्रुवारी
करुळ गावठण अ येथील दत्ताराम आकाराम साटम वय ८६ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तालुक्यात ते साटम गुरूजी नावाने परिचित होते. तालुक्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले होते. मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. गेली अनेक वर्षे ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते. अनेक वर्षे ते वैभववाडी तालुका पायी वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. गावांमध्ये पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. तसेच जिल्हा वारकरी संप्रदायचा त्यांना वारकरी पुरस्कार प्राप्त झाला होता. केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय अनेक पुरस्कार श्री.साटम यांना मिळाले होते.
वैभववाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वैभववाडी नागरी सहकारी पतसंस्थेचे ते व्हा. चेअरमन होते. रासाई देवी दूध संस्था करूळ चे संचालक म्हणून कार्यरत होते. वैभववाडी तालुका ग्राहक पंचायत समिती माजी सचिव होते.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. करुळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.