एक दिवस पोलिस कोठडी मिळाली. उद्या सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार
सावंतवाडी, दि.२५ फेब्रुवारी
सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्य करुन राहणाऱ्या १० बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी केली कारवाई केली आहे.त्याना एक दिवस पोलिस कोठडी मिळाली. उद्या सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय तसेच बांगलादेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय, तसेच बांगलादेशी नागरीकांबाबत गोपनियरित्या माहिती घेवून, शोध घेणेसाठी विशेष मोहिम राबवून परकीय नागरीक मिळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सूचना दिलेल्या होत्या.
बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याचे शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांचे स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या ६ नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी व वास्तव्यासाठीचे पारपत्र काढलेले नसून अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन बळवंतनगर, बांदा येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर ६ बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ), १४ (ब) व १४ (क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने सावंतवाडी पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराचे पाठीमागे एका पत्र्याचे शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांचे स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या ४ नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर ४ बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ व पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ (अ), ६ (अ), परकिय नागरीक आदेश १९४८ परि. ३(१), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले,आपल्या आजू-बाजूस कोणी बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्यास, सदरबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांना माहिती द्यावी.
बांदा पोलीस ठाणे ताब्यात घेतलेल्या ची नावे मोहम्मद शांत सरकार (२०), राजू मोहम्मद शाहिद मुल्ला (२६), मोहम्मद रबेल उर्फ असद उल्ला मोहम्मद फारुख खान (२६),मोहम्मद साई लदूत उर्फ मणिरूल फारुख खान (२६) मोहम्मद अन्वर अब्दुल हसीन सेकंड (६५) मुमताज बेगम मोहम्मद अन्वर अब्दुल हसीन सेकंड (४५) सर्व राहणार बांदा,बळवंत नगर ,मुळ बांगलादेश तसेच आरोंदा भद्रकाली मंदिर जवळपास पत्र्याची शेड मध्ये राहत असलेले सैफल अन्सार अली मोडंल (१९),
इनाजून युनूस बिस्वास (२०),सालेया बीबी युनुस बिस्वास (३९), आणि हुमायून बिस्वास (२०) राहणार बांगलादेश नागरिक यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले उद्या सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
यातील एकाकडेही पासपोर्ट नाही ते प्लास्टिक बाटल्या गोळा करून भंगार मध्ये विकण्याचा व्यवसाय करत होते याबाबत भंगारवाल्याची देखील चौकशी सुरू करण्यात येत आहे.