बनावट कागदपत्र आणि मालक असल्याचे भासवून २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

सावंतवाडी दि.२५ फेब्रुवारी 
केसरी (ता.सावतवाडी) येथील जमीन विक्री प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्र आणि मालक असल्याचे भासवून २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव म्हारकाटवाडी येथील ज्ञानेश्वर गवळी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अक्षय आनंद सावंत रा. कुब्रंल ता दोडामार्ग,अरुण डॅनी मीरांडा आणि अन्य चार जण यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आरोपी १ ते ६ यांनी प्रॉपर्टी खरेदी देण्याबाबत आमिष दाखवून खोटे बनावट दस्तऐवज आणि व्यक्ती उभे करून केसरी येथील सर्वे नंबर ८२ मधील ८ हेक्टर ५७ गुंठे जमीन खरेदी बाबत १२ मार्च २०२० ते १२ जानेवारी २०२१ दरम्यान खोटे दस्तऐवज, जमिनीचे मालक असल्याचे सांगणारे खोटे मालक तयार करून २० लाखांची फसवणूक केली म्हणून ज्ञानेश्वर गवळी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

सावंतवाडी पोलीस सहाय्यक निरीक्षक श्रीकांत इंगवले म्हणाले ,या प्रकरणांमध्ये आम्ही जलद गतीने तपास करून अक्षय आनंद सावंत रा. कुब्रंल ता. दोडामार्ग यांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी करून इतर पाच जणांच्या विरोधात कारवाई केली जाईल.