एस टी महामंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी कामगार सेनेची चर्चा.

देवगड,दि.२५ फेब्रुवारी
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. माधव कुसेकर (भा.प्र.से.) एसटी महामंडळात रुजू झाल्यावर प्रथमतः त्यांची भेट घेऊन सत्कार केला व प्रलंबित कामगार प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने उपस्थित केलेले मुद्दे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी गांभीर्याने ऐकून घेतले चर्चेदरम्यान मुद्दे समजून घेताना त्यांनी कामगारांना येणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडण्याच्या सूचना करून कामगार प्रश्नांवर चर्चा केली व ते लवकर सोडवण्याचे आश्वासन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिले
यात प्रामुख्याने
मुद्दा क्र १) आर्थिक प्रलंबित प्रश्न..
सन २०१६ पासून राज्य शासकीय कर्मचा-यां प्रमाणे मान्य केलेला वार्षिक वेतनवाढीचा १ टक्के फरक, त्याचप्रमाणे घरभाडे भत्ता फरक, सन २०१८ पासुन प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक तात्काळ अदा करावा तसेच २५००,४०००,५००० रुपये अशी मुळवेतनात वाढ दिल्यामुळे कर्मचा-यांच्या मुळ वेतनात विसंगती निर्माण झाल्या आहेत तरी ५००० रुपये सरसकट वेतनवाढ देवुन विसंगती दुर करण्यात याव्यात…
२) चालक, वाहक व यांत्रिक विश्रांती गृह..
आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचा-यांची विश्रांती गृहाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे तरी सर्व सोयी युक्त सुसज्ज असे विश्रांतीगृह कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.
३) मोफत पास
राज्य परिवहन कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबीयांना साध्या बस सह शिवशाही, हिरकणी या बसेस मध्ये फरकाची रक्कम अदा करुन मोफत पास ची सवलत देण्यात येत आहे. ही सवलत रा.प सेवेतील शिवनेरी व शयनयान बसमध्ये देण्यात येत नाही तरी सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये फरकाची रक्कम अदा न करता वर्षभरासाठी मोडतात पास ची सवलत देण्यात यावी..
४) अपहार प्रवण बदल्या…
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने अपहार प्रकरणात होणा-या बदल्या रद्द करण्याची मागणी केली. अपहार प्रकरणात दोष सिद्ध न होताच विभागीय स्तरावर वाहकांच्या बदल्या मनमानी पध्दतीने करण्यात येतात. तसेच अपहार प्रकरणात वाहकांकडुन मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल करुनही बदली सारखी दुसरी शिक्षा दिली जाते हा निर्णय वाहकांवर अन्याय करणारा असुन हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा..
५) प्रोत्साहन भत्ता..
कर्मचा-यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता हे कोणत्याही संस्थेच्या यशाचे गमक आहे. केलेल्या कामाचे कौतुक व आर्थिक हातभार लावला तर कर्मचारी कार्यक्षमतेने काम करण्यास प्रवृत्त होतील व महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल या करीता हकिम समितीने लागु केलेले सूत्रानुसार उत्पन्नावर आधारित चालक वाहक व यांत्रिक कर्मचा-यांना प्रोत्साहन भत्ता सुरू करावा…
६) अनुकंप तत्वावरील नेमणूक.
अनुकंप तत्वावरील नेमणूक देतांना ५ वर्ष सेवेची अट २१/९/२००१ च्या पुढील प्रकरणा साठी शिथिल करण्यात आलेली आहे. सदरची अट २१/९/२००१ पुर्वीच्या प्रकरणा साठी सुद्धा लागु करण्यात यावी.
७) स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ..
महामंडळाने कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्र. ३३/२०१७ नुसार कर्मचा-यांना स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार शिल्लक सेवा कालावधीच्या अधिन स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांना अनु. ७०००००,५०००००,३००००० रुपये लाभ देण्याचे मान्य केले होते परंतु काही विभागांनी अजूनही या योजनेचा लाभ कर्मचा-यांना दिला नाही. तो तातडीने देण्यात यावा..
८) निवडश्रेणी..
खात्यांतर्गत बढती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना हेतू पुरस्कर गैरसोयीच्या ठिकाणी बढती देण्यात येत असल्यामुळे कर्मचारी बढती नाकारतात. अशा परिस्थितीत कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्र. ४७/२०१८ नुसार बढती नाकारणाऱ्या कर्मचा-यांची निवडश्रेणी काढून घेतली जाते व बढती रद्द केली जाते. तरी बढती नाकारल्यास कर्मचा-यांची निवडश्रेणी काढून घेण्याची अट रद्द करण्यात यावी. तसेच काही विभागात डिप्लोमा अथवा बीई सारखे उच्च शिक्षित कर्मचा-यांना सहाय्यक पदावर सलग ५ वर्ष काम करुनही केवळ आयटीआय झालेले नाही म्हणून निवडश्रेणी ५ वर्षांऐवजी ७ वर्षानंतर दिली जाते. अशा कर्मचाऱ्यांना ५ वर्षानंतर निवडश्रेणी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने केली.
९) अतिकालीक भत्ता
राज्यभरामध्ये विविध विभागात अतिकालीक भत्ता कमी करण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. मोटार वाहन कायदा कलम १३ नुसार चालक वाहक यांनी प्रत्यक्ष ८ तास चलनीय कामगिरी केल्यास किंवा १२ तासापेक्षा जास्त विस्तारित कामगिरी केल्यास अतिकालिक भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याच्या या तरतुदीचे पालन राज्यातील विविध विभागांमध्ये होणे अपेक्षित आहे परंतु राज्यातील विविध विभागांमध्ये कायद्याच्या या तरतुदीचा राजरोसपणे भंग केला जात असुन कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला टाळण्याचे प्रकार समोर येत आहे. तरी चालक वाहक यांना कोणतीही कपात न करता श्रमाचा कायद्याच्या तरतुदी नुसार अतिकालीक भत्त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा..

१०) वैद्यकीय भत्ता..
रा.प.सेवेत 180 दिवस पूर्ण केल्यानंतर रोजंदारी गट क्रमांक २ वर नियुक्त कर्मचा-यांना लिखित अर्ज केल्याशिवाय वैद्यकीय भत्ता दिला जात नाही. तसेच दिला जाणारा वैद्यकीय भत्ता अत्यंत तुटपुंज्या स्वरूपात असल्याने कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी.
११) वाहक – संदिप खराडे सेवा खंडीत प्रकरण..
सांगली विभागातील शिराळा आगाराचे वाहक संदीप बाळासो खराडे क्र. ३८००९ यांची पक्षघाताच्या कारणास्तव सेवा खंडित केली आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेत त्यांना मेंदुचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांचा खास कर्करोग रजा अर्ज दप्तरी दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांनी खराडे यांना वाहक पदावर कामगीरी करण्यास अपात्र केल्यावर सांगली विभागाने त्यांना पर्यायी नोकरी न देता त्यांची सेवा खंडीत केली तसेच मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याचा कर्करोग खास रजा अर्ज सांगली विभागाने दफ्तरी दाखल केला आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्र. ४/२०२० च्या सूचनांचे उल्लंघन करून विभाग नियंत्रक सांगली यांनी बेकायदेशीर सेवा खंडित केली आहे. तरी संदीप खराडे वाहक यांना पर्यायी नोकरी देण्यात यावी व त्यांचा कर्करोग खास रजा अर्ज मंजूर करण्यात यावा…
उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व विषयावर सखोल व मुद्देसूद चर्चा केली. काही विषय स्वतंत्रपणे मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी कामगार सेनेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करून कामगार सेनेने उपस्थित केले प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. कामगार सेनेच्या शिष्टमंडळामध्ये राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे, राज्य संघटक सचिव सुभाष जाधव, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, चिटणीस राजेंद्र पाटील, गंगाधर चंद्रमोरे (कार्यालयीन सचिव) पुणे प्रादेशिक सचिव वसंत पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख नुरमोहंम्मद शेख विभागीय सचिव कोल्हापूर संदिप घाडगे उपस्थित होते.