वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राधानगरी येथे दिली भेट ; त्या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार..
कणकवली दि.२५ फेब्रुवारी(भगवान लोके)
रानडुकराचे मांस विकत असल्याप्रकरणी वनविभागाने फोंडाघाट , कासारवाडी येथिल दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यावर वनकोठडी मिळाली होती. ती मुदत संपत असल्याने सोमवारी त्या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान,त्या रानडुकराची अवैधरित्या शिकार केलेल्या मुख्य आरोपीचा कसून शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.राधानगरी येथील त्याच्या घरी जाऊन त्याच्या बाबत चौकशी करण्यात आली.मात्र, तो पसार झाला आहे.
फोंडा येथील गुरुनाथ मधुकर येंडे यांच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये रानडुकराचे मांस ठेवल्याचे वनाधिकाऱ्याना आढळुन आले होते.त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर गुरुनाथ येंडे यांच्यासह चंद्रकांत शिरवलकर यांनी ते मांस राधानगरी येथाल विजय नामक व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्या कातकरी समाजातील व्यक्तीचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
या गुन्ह्याबाबत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी धुळु कोळेकर, अतुल खोत व वनसेवक सुधाकर सावंत हे तपास करीत आहेत.