श्री देवी भराडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात…

दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय व आंगणे ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून अहोरात्र परिश्रम-अध्यक्ष भास्कर आंगणे

मालवण,दि. २६ फेब्रुवारी

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला २ मार्च पासून सुरुवात होत असून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रा पाच दिवसांवर येऊन ठेपली असून दोन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवास येणार्‍या लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय व आंगणे ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत. यावर्षी यात्रेत येणार्‍या दिव्यांग भाविकांसाठी आंगणेवाडी येथे मालवण व कणकवली दिशेने असलेल्या दोन्ही वाहनतळाच्या ठिकाणी रिक्षाची व्यवस्था करून तेथून दिव्यांग भाविकांना रिक्षात बसवून मंदिरात दर्शनासाठी आणण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा २ मार्च रोजी होत आहे. यात्रेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. २ रोजी पहाटे ३ वाजल्या पासून विविध रांगांद्वारे भाविकांना भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. या यात्रोत्सवाससिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच राज्यातील लहान मोठे व्यापारी आपापली दुकाने थाटतात. यासाठी महिनाभर अगोदर दुकानांच्या जागा निवडण्यात येतात. गेले आठ दहा दिवस व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. मंदिराकडे येणार्‍या रस्त्यांवर लाईट व्यवस्था, सर्वत्र विद्युत रोषणाई, मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याकडेही लक्ष दिले जात आहे.

यावर्षीही यात्रेला भाविकांचा जनसागर उसळेल असा अंदाज व्यक्त होत असून यावर्षी भाविकांच्या सुरक्षेला तसेच सुलभ दर्शन होण्यास प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे. यावर्षी दिव्यांग बांधवांना भराडी मातेचे दर्शन घेण्यासाठी आंगणे ग्रामस्थ मंडळाने विशेष सोय केली असून आंगणेवाडीत मालवण व कणकवलीच्या बाजूने असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी दिव्यांग भाविकांना मंदिरा पर्यंत नेण्यासाठी रिक्षा उपलब्ध करण्यात येणार आहे, यामुळे त्यांना विनसायास व सुलभ दर्शन होईल, अशी माहिती भास्कर आंगणे यांनी दिली.