तळेरे येथे उद्या मराठी राजभाषा गौरव दिन : काव्यवाचन, अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन

तळेरे,दि. २६ फेब्रुवारी

तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने बुधवारी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन सकाळी 10 वा. नामवंत कवी डॉ. अनिल धाकू कांबळी यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी कविता वाचन आणि अक्षरोत्सव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम होणार असून यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वा. निकेत पावसकर यांच्या संग्रहातील विविध संदेश पत्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत होईल. यावेळी विविध व्यक्तींचे सत्कार करण्यात येतील.

या कार्यक्रमानंतर वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी डॉ. अनिल धकू कांबळी यांच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण करतील. त्या कवितांची निर्मितीमागील गोष्ट यावेळी डॉ. अनिल धाकु कांबळी व्यक्त करतील. याचदरम्यान दुपार पर्यंत यावेळी देश आणि परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला विविध शालेय विद्यार्थी, पालक, रसिक आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.