साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे मत;’महाराष्ट्र काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान
कणकवली दि.२७ फेब्रुवारी(भगवान लोके)
इतिहासातील चुकांचा अभ्यास आणि दुर्गुणांचा त्याग करून मराठी माणूस एकत्र आल्यास, महाराष्ट्र पुन्हा जग आणि देशावर राज्य करेल. असे मत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
कणकवली येथे स्वामी विवेकानंद सभागृहात तळेरे येथील संवाद परिवार यांच्यावतीने ‘महाराष्ट्र काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. मोरे बोलत होते. यावेळी डॉ. सर्वेश नारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.
सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला ऐतिहासिक व गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे इतर प्रांतातील व्यक्तीपेक्षा मराठी माणसाला इतिहासाबद्दल जाणीव आहे. मराठ्यांमध्ये असलेली क्षमता व कार्यकर्तृत्वपणा पाहून १९१९ साली मराठे देशावर व जगावर राज्य करतील, असे भाकित बंगालमधील एका विचारवंताने केले होते. मात्र, त्यांचे हे भाकित संधी असतानाही मराठे खरे करू शकले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीतील व्यक्तींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. जाती व्यवस्थेतील सकारात्मक गोष्टी शिवरायांनी हेरून राज्यकारभार केला. इतिहासात झालेल्या चुकांतून आधुनिक युगातील मराठी माणसाने शिकले पाहिजे त्या चुकांची पुनरावृती होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे अवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, पानिपतच्या लढ्यात मराठ्यांचा झालेला पराभव हा धक्कादायक होता. या पराभवातून सावरून मराठ्यांनी पुन्हा उचल घेतली आहे. त्यानंतर परकियांच्याविरुद्ध मराठ्यांनी खंबीरपणे लढा दिला होता. मोघलांना संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घ्यायचा होता. मात्र, मराठ्यांमुळे ते शक्य झाले नाही. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम इंग्रजांनी केले. कारण त्यांना माहित होते, मराठे एकत्र राहिले तर आपण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करू शकणार नाही. इंग्रजांनी आपल्या राजवटीत मराठा व शिवरायांच्या खरा इतिहास न सांगता चुकीचा इतिहास सांगितला.
इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी जहाल व मवाळ गट तयार झाले होते.त्यांच्यात संघर्ष होता, परंतु भारत स्वतंत्र करणे, हे या दोन्ही गटाचे एकमेव उद्दिष्ट होते. लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व देशाला मान्य होते. मात्र, काँग्रेसने टिळक यांना कोणत्याही अधिवेशनाचे अध्यक्षपद दिले नाही. याची कारणे आहेत. आजच्या आधुनिक युगातील धर्माचार्यांना आधुनिक ज्ञान असले पाहिजे. देशातील जातीयता संपुष्टात आणायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे, हाच जातीयता संपुष्टात आणण्याचा रामबाण उपाय आहे, असेही त्यानी सांगितले.
या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. यात दादा कुडतरकर, डॉ. संदीप साळुंखे, संदीप राणे, डॉ. प्रसाद देवधर, दत्तात्रय मारकड यांनी मोरे यांना इतिहासासंबंधित प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. संवाद परिवारातर्फे डॉ. मोरे यांचे डॉ. प्रसाद देवधर यांनी स्वागत केले.यावेळी अशोक करंबेळकर, डॉ. सर्वेश नारकर हे उपस्थित होते. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.


