सरमळे येथील श्री सपतनाथचे मंदिर येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका रात्रीत बांधण्यात येणार

सावंतवाडी,दि.२७ फेब्रुवारी
सरमळे येथील श्री सपतनाथचे मंदिर येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका रात्रीत बांधण्यात येणार आहे. सरमळे गावातून जाणाऱ्या बांदा – दाणोली या जिल्हा मार्गालगत हे शिव क्षेत्र असुन याला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. यावेळी सरमळेवासियांच्या एकजुटीचे दर्शन घडणार असुन मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांचीही गर्दी होणार आहे.
सरमळे गावातून जाणाऱ्या बांदा – दाणोली या जिल्हा मार्गालगत एका बाजूला तेरेखोल नदी असून दुसऱ्या बाजूला हिरव्या गर्द वनराईत श्री सपतनाथ हे शिव क्षेत्र आहे. प्रत्येक शिव क्षेत्राचे आगळे महात्म्य असुन सरमळेच्या सपथनाथाचीही भक्तांच्या हाकेला धावणारा, आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव उभा राहणारा आणि माहेरवाशिणीसह महिला भाविकांचा पाठीराखा अशी ख्याती आहे. तसेच या जिल्हा मार्गावरून जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहनचालक प्रवासी भाविकांचे सपथनाथ श्रद्धास्थान असुन ते न चुकता या ठिकाणी श्रद्धेने नतमस्तक होतात. सरमळेतील या जिल्हा मार्गाच्या ठिकाणी निसर्गाचा आविष्कार असुन घनदाट झाडीचा हिरवागार परिसर पाहिला की मनाला थंडावा मिळतो. तसेच विस्तीर्ण तेरेखोल नदी असल्याने या मार्गावर जाणारे सर्वजण हमखास थांबतात आणि मनोकामना पूर्तिसाठी सपतनाथाकडे मन मोकळे करतात.
या ठिकाणी शिवलिंग व पिंडी असून बाजूला पुरातन देव त्यांच्या पुरातन मूर्ती आहेत. या सपनाथच्या परिसरात पांडवांच्या पाऊलखुणा आढळत असून या ठिकाणचा इतिहास पांडवकालीन असल्याचे ग्रामस्थ सांगतात. निसर्गाच्या सानिध्यातील या धार्मिक ठिकाणी महाशिवरात्रीला वार्षिक उत्सव असतो. यादिवशी तीर्थस्थानासाठी सरमळे गावचे ग्रामदैवत सातेरी भगवती देवस्थानची पालखी, तरंगे, निशाणकाठीसह सवाद्य मिरवणुकीने ठिकाणी येतात.

या मंदिराचा नियोजित आराखडा तयार करण्यात आला असुन मंदिराच्या या जिर्णोद्धारात सपतनाथचा निस्सीम भक्त असलेल्या गोवा येथील एका भाविकाचा यात सिंहाचा वाटा आहे. सपतनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे हे मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामुळे भक्तीमय वातावरणात हे मंदिर साकारण्यात येणार असुन एका रात्रीत या नियोजित वेळेत हे मंदिर होण्यासाठी क्षणाचीही विश्रांती न घेता हे धार्मिक कार्य पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.