ग्राहकांशी मराठीतूनच बोला राष्ट्रीयकृत बॅंकांना ‘कोमसाप’चं निवेदन

 सावंतवाडी,दि.२७ फेब्रुवारी
महाराष्ट्राची मायबोली अर्थात मराठीचे विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संवर्धन व्हावे, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने पुढाकार घेतला आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून कोमसाप, सावंतवाडी शाखेद्वारा सावंतवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी, बँक ऑफ महाराष्ट्र आणि उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आली.
यावेळी कार्यालयीन कामकाजात ‘मराठी’चा वापर करण्याच्या मागणीसह बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतूनच संवाद साधण्याची सुचना केली.

यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य शाखाधिकारी मनीष कुमार झा, बँक ऑफ इंडियाचे मुख्य शाखाधिकारी शरद पेडामकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमोल माने तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, कार्यालयीन अधीक्षक रूपाली हेळेकर यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने माय मराठीच्या संवर्धन आणि प्रचार, प्रसारबाबत विनंती करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार प्रा. डॉ. जी. ए. बुवा, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण मराठी साहित्य परिषदे शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, कोमसापचे ज्येष्ठ सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप जिल्हा शाखेचे खजिनदार भरत गावडे, कोमसाप सदस्य प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस तसेच ‘सामाजिक बांधिलकी’ प्रतिष्ठानचे रवी जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यालयातील बुहतांशी अधिकारी व कर्मचारी हे इंग्रजी व हिंदी भाषेचा संवादामध्ये वापर करत आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी आपल्या बोली भाषेत मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी विनंती ‘मराठी भाषा दिना’ निमित्त आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा – सावंतवाडीच्यावतीने करण्यात आली. कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत मराठी भाषेचा वापर ग्राहकांशी संवाद साधताना करावा असे सूचित करण्यात आले. निवेदन स्वीकारलेल्या कार्यालयीन प्रमुखांनी आपण जास्तीत जास्त मराठी संवर्धनाचा प्रयत्न करू, ग्राहकांशी मराठीतूनच संवाद साधू तशा सुचना कर्मचारी वर्गाला करू, कुठलीही अडचण आल्यास आम्ही पुर्ण सहकार्य करू असे कोमसाप सावंतवाडी शाखेला आश्वासित केले.