आम.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचा यशस्वी तोडगा
देवगड,दि.२७ फेब्रुवारी
अतिशय दुर्गम भागातील आरे या गावातील गणपतीवाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये चार विद्यार्थी शिकत होते. परंतु पटसंख्या अभावी पहिली ते चौथीपर्यंत असलेली जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. चार विद्यार्थी काही महिने शिक्षणापासून वंचित राहिले. त्या चार विद्यार्थ्यांपैकी तीन मुलांनी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यायी शाळेचा मार्ग निवडला. मात्र चिरंजीव खरात याच्या जिद्दीपुढे प्रशासनाने हात टेकले असून आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी यशस्वी तोडगा काढल्याने पुन्हा एकदा 53 दिवसांनी शाळेची घंटा वाजणार असल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
परंतु चिरंजीव सुनील खरात हा विद्यार्थी गेले दोन महिन्यांपासून स्वतः शाळेचे कुलूप उघडून शाळेमध्ये बसून अभ्यास करायचा. मात्र शिकवण्यासाठी दोन महिन्यांमध्ये एकही शिक्षक या शाळेमध्ये फिरकला देखील नाही. मात्र आता गेले चार ते पाच दिवसांपासून चिरंजीव खरात याच्याकडे शाळेची असलेली चावी शिक्षक घेऊन गेल्यामुळे चिरंजीव खरातला शाळेच्या आवारामध्ये बसूनच अभ्यास करावा लागत होता.
आमदार नितेश राणे यांनी सांगितलं की, जर आमच्या विद्यार्थ्यांशी भविष्याबद्धल कोण खेळत असेल तर आम्ही सहन करणार नाही. या प्रकाराची संपूर्ण माहिती घेऊन आणि संबंधित शिक्षिकेवर कारवाई कशी करता येईल? याकडे लक्ष देईन. जेणेकरून विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये.यासाठी आम.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,माजी सरपंच महेश पाटोळे, उपसरपंच रत्नदीप कांबळे,संदीप कदम,बंटी जेठे, सत्यवान पाटोळे,भाऊ कदम तसेच चिरंजीव ची आई आरे गणपत वाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन वस्तुस्थिती जाणून घेत त्यावर यशस्वी तोडगा काढण्यात त्यांना यश आले.गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी पत्रानंतर २८ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा गणपती वाडी येथील शाळेची घंटा वाजणार असल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र तोडगा काढूनही आरे गणपती वाडी जिल्हा परिषद शाळा सुरू न झाल्यास पंचायत समितीवर धडक मोर्चा आणू असा इशारा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांनी दिला आहे.
गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,गणपतीची वाडी येथील शिक्षकेची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे शाळा नंबर एक येथे 3 जानेवारीपासून करण्यात आली होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव सदरची पर्यायी व्यवस्था २७ फेब्रुवारी रद्द करण्यात येत असून २८ फेब्रुवारी पासून आपण आपली मूळ शाळा आरे गणपतीची वाडी येथे कामकाज करायचे आहे.आपले रजा कालावधीत शिक्षक उपलब्ध नसल्याने पालक विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देऊन शाळा बंद ठेवावी शाळा किंजवडे नंबर एक येथील सद्यस्थितीत कार्यरत स्वयंसेवक सदर शाळेचे कामकाज पूर्ण अधिकाऱ्याने करतील दीर्घ आजारी शिक्षक खोत यांच्यासाठी अजून एक स्वयंसेवकाची स्थानिक पातळीवर नेमणूक तात्काळ करण्यात यावी असेही गटशिक्षणाधिकारी यांनी पत्रकात म्हटले आहे.