देवगड,दि.२७ फेब्रुवारी
मराठी भाषा ही मराठी माणसाची माता आहे असे प्रतिपादन लोचन भगत हिने केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिन समारंभात त्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी मंचावर श्रावणी जाधव , दीक्षा अदम , प्रियंका माळी , आर्या मणचेकर,उदी कुलकर्णी , दुर्गा भिडे , छाया शिंदे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना लोचन भगत पुढे म्हणाल्या की मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे अशी हाकाटी मारायची आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्दी करायची असे चित्र सध्या दिसते .खरे म्हणजे मातृभाषेतून विचारांचे व भावनांचे आदान प्रदान सहजपणे करता येते . म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असायला हवे असे मत व्यक्त केले.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना श्रावणी जाधव यांनी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी साहित्यातील भीष्माचार्य होते असे सांगून शिरवाडकरांच्या साहित्यात सौंदर्य , प्रक्षोभ , प्रेम , चंद्र , चांदणे , निर्झर तृणपाती ,दवबिंदू याबरोबरच क्रांती , लढा ,प्रलय , उद्रेक , असंतोष हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते असे सांगितले. आपल्या साहित्यात त्यांनी सामान्य माणूस हाच आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू ठेवला होता.
मराठी भाषा गौरव दिन समारंभात विद्यार्थ्यांनीच आयोजित केलेल्या समारंभात कुमारी आर्या मणचेकर हिने भाषाशुद्धी व सावरकर , दीक्षा अदम हिने भाषेची गंमत ,दुर्गा भिडे हिने म्हणी , उदी कुलकर्णी हिने श्लोक तसेच वरद दुधवडकर ,उदी कुलकर्णी , छाया शिंदे व सुनील जाधव सर यांनी नामवंत कवींच्या कविता सादर केल्या .
प्रशालेत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी , अभिरूची वाढावी यासाठी वाचन प्रेरणा हा उपक्रम प्रशालेत राबवण्यात आला. या उपक्रमाचे प्रमुख विनायक ठाकूर यांनी यशवंत विद्यार्थ्यांची घोषणा करून त्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुमारी सिद्धी राऊत सूत्रसंचालन रिद्धी थोटम व आभार प्रदर्शन प्रियंका माळी हिने केले.