तब्बल ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची केली लुबाडणूक ; तिघांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
कणकवली दि.२७ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली येथील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांची पत्नी शुभांगी सूर्यकांत तायशेटे यांच्याकडून शेअर्स मार्केटमध्ये तुमच्या नावे शेअर्स खरेदी केल्यावर दामदुप्पट पैसे मिळवून देतो असे खोटे आमिष दाखवत तब्बल ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपये धनादेशाद्वारे आरोपींनी स्वीकारले.त्यानंतर मनी कंट्रोल ॲपद्वारे संशयित आरोपींनी खोटे स्टेटमेंट दाखवत डॉ.तायशेटे यांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित आरोपी विवेक विजय पार्टे,पत्नी वेदिका विवेक पार्टे,(दोघेही रा.शिरोडा नाका,सावंतवाडी),प्रथमेश श्रीकांत राणे( रा.इन्सुली,सावंतवाडी) यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी भादवी कलम ४०६,४२०,२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे राह.कणकवली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वतः २० लाख १९ हजार ९३४ रुपये आणि पत्नी शुभांगी सूर्यकांत तायशेटे यांचे १२ लाख ७५ हजार रुपये एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपये शेअर्स खरेदी करण्यासाठी आम्ही गुंतवणूक १९ जुलै २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपी यांच्याकडे केली.आरोपींनी आमिष दाखवत आमच्याकडुन धनादेश घेत कोणत्याही प्रकारचे शेअर्स आमच्या नावे न घेता बनावट मनी कंट्रोल ॲप डाऊनलोड करुन देवून बनावट स्टेटमेंट देवून आमचा विश्वास संपादन करत एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची आरोपींनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करीत आहेत.
शेअर्स खरेदीच्या नावे भामट्यानी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा..
या प्रकरणातील संशयित भामट्या ३ आरोपींनी जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या डॉक्टरांची फसवणूक केली आहे.कोट्यावधी रुपये गोळा करून तुमच्या नावाने शेअर्स खरेदी करतो, या आमिषाने अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक केली आहे.त्यामुळे कणकवली डॉ.सूर्यकांत तायशेटे यांचे एक प्रकरण उघड होताच, या प्रकरणाची चर्चा कणकवलीसह जिल्हाभरात जोरदार रंगू लागली आहे.