मालवण, दि.२७ फेब्रुवारी
भाजी घ्या… लाडू घ्या… थंडा घ्या… कुरकुरे घ्या… अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करून आपल्या मालाची विक्री करणारे विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक, पालक व ग्राहक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साहपूर्ण वातावरणात आज मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा आठवडा बाजार संपन्न झाला.
मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळे मार्फत बाल आनंद मेळावा अंतर्गत गेली अनेक वर्ष आठवडा बाजार भरविण्यात येत असून यंदाही हा बाजार प्रशालेच्या मैदानावर भरविण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, खरेदी विक्री याचे ज्ञान मिळावे, भविष्यात त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडा बाजार भरविण्यात येतो. या बाजाराचे उदघाटन भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे लोकल कमिटी सदस्य दशरथ कवटकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षक सौ. राधा दिघे, श्री. लोकेगावकर, सौ. पूर्वी गोवेकर, श्री. बोवलेकर, माजी मुख्याध्यापिका प्रज्ञा कांबळी, आर. डी. बनसोडे, नंदकिशोर मळेकर, केशव भोगले आदी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी लाडू, बिस्किटे, जिलेबी, काजुगरसहित मालवणी मेवा आदी विविध खाद्य पदार्थ, भाज्या व फळे, कडधान्ये, नारळ, पाणी बॉटल, फालुदा व सरबत आदी शीतपेये, कांदाभजी असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस मांडल्या होत्या. तसेच बॅनर लावून व आरोळ्या देऊन आपल्या मालाची जाहिरातही केली. यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, हायस्कुलचे विद्यार्थी व ग्राहकांनी या बाजारात खरेदी करून उत्तम प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिले.