फोंडाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

भाषा समृद्ध तर संस्कृती समृद्ध… डॉ सतीश कामत

फोंडाघाट,दि.२८ फेब्रुवारी(संजय सावंत)
बऱ्याचदा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती कशी रुजवावी? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो, पण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतः वाचन तर करतातच, पण त्यांच्याकडील अमूल्य अशी ग्रंथसंपदा वाचून झाल्यानंतर महाविद्यालयाला देणगी रूपाने देतात, ही अतिशय आनंददायक व प्रेरणादायक बाब आहे. महाराष्ट्र शासनानेही मराठी भाषेचा विकास होण्यासाठी रिद्धीपुर या ठिकाणी स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या वाढीस निश्चितच चालना मिळेल व एक अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळेल. मराठी वाचनामुळे मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समृद्ध होत असते.असे प्रतिपादन फोंडाघाट महाविद्यालय प्रभारी प्राचार्य सतीश कामत यांनी केले ते कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमच्या सुरुवातीला मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीनी मराठीत लिहिलेल्या अनंतरंग भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ सतीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गर्जा महाराष्ट्र माझा… हे महाराष्ट्र गीत व लाभले आम्हास भाग्य… हे माय मराठी समुहगीतही सादर केले. सोबतच मी मराठी मी मराठी… हे समूह नृत्यही अतिशय कल्पकपणे सादर केले.
यावेळी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ सतीश कामत पुढे म्हणाले, हल्ली सर्वत्रच कला शाखेतील विद्यार्थी संख्या रोडावत चाललेली दिसते. ती संख्या वाढवायची असेल, तर मराठी भाषेतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी शोधून काढायला हव्यात. मराठी साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालेले समाजजीवन अनुभवून आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास, नक्कीच आपले जीवन आनंदी व समृद्ध होऊ शकेल, असा संदेशही त्यांनी दिला.यानंतर प्र. प्राचार्य डॉ सतीश कामत यांनी या सादरकर्त्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले, तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा जगदीश राणे यांनी केले तर आभार प्रा कीर्ती पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.